पिंपरी चिंचवड: 'ड्राय डे' ला पबमध्ये मद्य विक्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) राज्यभरात मद्य विक्रीस मनाई असताना जगताप डेअरी चौकातील '१८ डिग्री' या पबमध्ये बिनदिक्कतपणे मद्य विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संग्रहित छायाचित्र

पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष, नियमांना दाखवली केराची टोपली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) राज्यभरात मद्य विक्रीस मनाई असताना जगताप डेअरी चौकातील '१८ डिग्री' या पबमध्ये बिनदिक्कतपणे मद्य विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या हॉटेलने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्षभराचे शुल्क भरले नसून शासनाचा महसूल देखील बुडत आहे. राजरोसपणे हे सर्व प्रकार सुरू असताना वाकड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

शहरातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट पब दीड वाजता बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. याची कडेकोट अंमलबजावणी होते का नाही, हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असून, विनापरवाना मद्य विक्री होत असल्यास पोलिसांकडून देखील कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई छोट्या प्रमाणात होत असून, बड्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाकड अन् हिंजवडी परिसरातील अनेक छोट्या मोठ्या हॉटेल मध्ये विनापरवाना मद्य विक्री सुरू आहे. पोलिसांच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचे बोलले जाते. दर वर्षी डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी ड्राय डे असतो. या दिवशी सर्व अधिकृत मद्य विक्री हॉटेल बंद ठेवावे लागतात. या दिवशी जर एखादे हॉटेल सुरू असेल तर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यावर कारवाई केली जाते. संबधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला जातो.

मात्र, यंदा वाकड परिसरात काही अधिकृत आणि अनधिकृत हॉटेलमध्ये खुलेआम मद्य विक्री सुरू होती. नागरिकांकडून जादा पैसे घेऊन त्यांना मद्य पुरविले जात होते. या प्रकरणी १८ डिग्री पबवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दररोज येथे मद्य विक्री होत असताना, एका नागरिकाने तक्रार केल्यावर १४ बिअर बाटल्या आढळून आल्या अशी दिखाऊ कारवाई वाकड पोलिसांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर देखील मद्य विक्री थांबलेली नाही. दरम्यान, परिसरात चालणाऱ्या अवैध मद्य विक्रीवर वाकड अन् हिंजवडी पोलीस कधी कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शुल्क भरलेल्यांची माहिती देऊ शकत नाही - निरीक्षक पराळे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पिंपरी येथील निरीक्षक सुनील पराळे यांना याबाबत विचारणा केली असता, किती व्यावसायिकांनी परवाना शुल्क भरले आहे किंवा नाही याची माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. याबाबत माहिती आम्हाला येथून देता येणार नाही; असे निरीक्षक पराळे यांचे म्हणणे आहे.

आमच्याकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. तक्रार येताच तसेच आमच्या पथकाला माहिती मिळताच आम्ही कारवाई करीत असून, यामध्ये सातत्य आहे. कारवाईचा आलेख हा चढता राहिला आहे. तसेच यापुढेही कारवाई ही सुरूच राहणार आहे.
-डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड विभाग

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest