पुणे: डॉक्टरच्या बंगल्यात ४४ लाखांची घरफोडी; सिंहगड रस्त्यावर घडली घटना

शहरात घरफोड्यांचे सत्र हळूहळू वाढू लागले आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि विकेंडचे दिवस साधून अनेकजण सहलीचे नियोजन करीत आहेत. त्याचाच गैरफायदा चोरटे घेताना दिसत आहेत. सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला.

डॉक्टरच्या बंगल्यात ४४ लाखांची घरफोडी; सिंहगड रस्त्यावर घडली घटना

सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांचा तपास सुरू

शहरात घरफोड्यांचे सत्र हळूहळू वाढू लागले आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि विकेंडचे दिवस साधून अनेकजण सहलीचे नियोजन करीत आहेत. त्याचाच गैरफायदा चोरटे घेताना दिसत आहेत. सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी तब्बल ७८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली.  ही रक्कम ४४ लाख रुपयांच्या घरात आहे.

ही घटना शनिवारी (दि. २७) संध्याकाळी सव्वापाच ते रविवारी (दि. २८) दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी डॉ. चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (वय ६८, रा. सफलानंद सोसायटी, संतोष हॉलजवळ, आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्याआधारे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चंद्रकांत आठल्ये आणि त्यांचा मुलगा डॉ. सचिन आठल्ये हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. फिर्यादी आठल्ये हे प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचा शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावर दवाखाना आहे. तसेच, ते रुबी हॉल क्लिनिक आणि अन्य रुग्णालयांमध्येदेखील वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यांचा या क्षेत्रातील ४० वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. डॉ. सचिन आठल्ये यांचादेखील शिवाजीनगर येथे दवाखाना आहे. ते नेत्ररोग तज्ज्ञ (आय सर्जन अँड कॉर्निया सपेशालिस्ट) आहेत. तेदेखील रुबी हॉल क्लिनिकसह अन्य रुग्णालयांमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून काम करतात. तसेच, आयरा आय केअर  नावाने संस्था चालवतात.

डॉ. आठल्ये यांचे भोर-वेल्हा परिसरात फार्म हाऊस आहे. त्या ठिकाणी अधूनमधून कुटुंबातील सर्वजण राहण्यासाठी जात असतात. शनिवारी सर्व कुटुंबीय संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास भोरला जाण्यासाठी घरामधून बाहेर पडले. एक दिवस फार्म हाऊसवर घालवल्यानंतर सर्वजण रविवारी घरी परतले. त्यावेळी त्यांना बेडरूममध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममधील कपाट उचकटल्याचे आणि आतील मौल्यवान ऐवज गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक क्षीरसागर, साहाय्यक निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक जायभाय, लाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी पोलिसांचे ‘आय कार युनिट’ व ‘श्वान पथका’ला पाचारण केले. घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांनी बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले. त्यामध्ये मोटारसायकलवरून तीन चोरटे येताना आणि चोरी करून जाताना दिसत आहेत. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, त्याची स्पष्टता नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. पोलिसांनी बंगल्याच्या आसपासच्या भागातील तसेच रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

चोरट्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्यानंतर मागील बाजूस असलेल्या बेडरूमच्या बाजूला गेले. बेडरूमच्या खिडकीचे गज कापले. या खिडकीमधून बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उचकटण्यात आले. कपाटातील कप्प्याचे लॉक तोडण्यात आले. या कप्प्यात ठेवण्यात आलेले दागिने काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी डॉ. सचिन यांच्या बेडरूमकडे मोर्चा वळवला. त्यांच्या देखील कपाटातील कप्पा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लांबवली.

याबाबत बोलताना सहायक निरीक्षक तथा तपास अधिकारी सचिन निकम यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, ‘‘घरफोडी झालेल्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या राहत्या घराच्या दोन बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४४ लाख १९ हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील चोरट्यांकडे चौकशी करण्यात येत आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest