पुणे: नवी कार घेऊन थेऊरला दर्शनासाठी आलेल्यांचा प्राणांतिक अपघात; तिघांचा मृत्यू

पुणे : नवी मोटार खरेदी केल्यानंतर थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या एकाच कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला. देव दर्शन करून घराकडे परत जात असतानाच काळ बनून आलेल्या ट्रकने या मोटारीला समोरून धडक दिली.

Pune Accident News

नवी कार घेऊन थेऊरला दर्शनासाठी आलेल्यांचा प्राणांतिक अपघात; तिघांचा मृत्यू

लोणीकंद-थेऊर रस्त्यावर काळ बनून आला ट्रक

पुणे : नवी मोटार खरेदी केल्यानंतर थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या एकाच कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला. देव दर्शन करून घराकडे परत जात असतानाच काळ बनून आलेल्या ट्रकने या मोटारीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात लोणीकंद-थेऊर रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मंदिरासमोर रविवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडला. लोणीकंद पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६), विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघेही रा. एल अँड टी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी अपघातात दगावलेल्यांची नावे आहेत. तर, हेमंत लखमन दलाई (वय ३०, रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी, ता. बारामती) याच्याविरुद्ध भादवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली, मूळ रा. कौठाळा, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जाधव, भोजणे, जोगदंड, दलाई, फिर्यादी पांचाळ हे सर्वजन रांजणगाव एमआयडीसीमधील ‘स्टेरीऑन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत काम करतात. जाधव यांनी नवीन मोटार घेतली होती. गाडी नवीन असल्याने सर्व मित्रांनी मिळून जवळच असलेल्या थेऊर तेथे चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. त्यानुसार, रविवारी दोन मोटारी घेऊन सर्वजण देवदर्शन करण्यासाठी आले होते. त्यामध्ये जाधव यांनी घेतलेली नवीन मोटार देखील होती. नवीन मोटारीत जाधव, भोजणे, जोगदंड आणि दलाई असे चौघे बसले होते. तर, दुसऱ्या मोटारीमध्ये फिर्यादी पांचाळ आणि त्यांचे अन्य चार मित्र बसलेले होते. देवदर्शन करून हे सर्वजण लोणीकंद-थेऊर रस्त्याने निघाले होते.

केसनंदकडून लोणीकंदकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मंदिरासमोर आरोपी जाधव चालवीत असलेल्या भरधाव ट्रकची (एमएच ०१, एएफ ०७५३) जाधव यांच्या मोटारीला समोरून धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की पुढील बाजूने ही मोटार पूर्णपणे चेपली. दरम्यान, पाठीमागून येत असलेल्या फिर्यादी पांचाळ आणि त्यांच्या मित्रांनी हा अपघात पाहिला. त्यांनी स्वत:ला सावरत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, अपघात घडल्याचे पाहताच स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलीस आणि रुग्णवाहिकेला दूरध्वनीद्वारे माहिती कळवण्यात आली. पोलीस आणि रुग्णवाहिकेची मदत तात्काळ मिळाल्याचे फिर्यादी पांचाळ यांनी ‘मिरर’शी बोलताना सांगितले. दरम्यान, गाडीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यास वेळ लागत होता. एकामागे एक असे तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या दलाई यांच्यासह अन्य तीन जणांना उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जाधव, भोजणे आणि जोगदंड यांना उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे, उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, मनोज बागल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करीत गुन्हा दाखल केला. तसेच, ट्रक चालकाला ताब्यात घेऊन अटक केली. जाधव, भोजणे आणि जोगदंड हे तिघेही विवाहीत होते. त्यांना लहान मुले आहेत. नोकरीच्या निमित्ताने हे सर्वजन विविध जिल्ह्यांमधून पुणे जिल्ह्यात राहण्यासाठी आलेले होते. त्यांच्या परिवारावर या अपघातामुळे मोठा आघात झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक कैलास करे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest