संग्रहित छायाचित्र
प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि नातेवाईकांसह जमाव करून भांबोली येथील कोरल लॉजिस्टिक इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. विद्युत पुरवठा करणारी वायर तसेच गॅस लाईन तोडून नुकसान केले.
ही घटना बुधवारी (२ ऑक्टोबर) घडली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज), अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरामध्ये चैतन्य महाराज वाडेकर हे राहतात. त्यांच्या घराजवळ कोरल लॉजिस्टिक्स असेस्ट इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीची इमारत आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता बेकायदेशीर खोदला. यावेळी त्यांचे इतर एक नातेवाईक आणि दोन बंधू होते. तसेच कंपनीच्या कंपाउंडचे पत्रेही काढले आहेत. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून जेसीबी व पोकलेनच्या साह्याने कंपनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. कंपनीच्या सुरक्षा भिंती पाडल्या. रस्त्यावर खड्डे खोदले. पाण्याच्या पाईपलाईन, विद्युतपुरवठा करणाऱ्या वायर आणि एमएनजीएल गॅस लाईन तोडली. गॅस परिसरात पसरून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. अखेर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करत वरील आरोपींना अटक करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.