संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: घरगुती वादातून काही वर्षे विभक्त राहिल्यावर पुन्हा संसार सुरू झाल्यावर पत्नीने पतीवर काळ्या जादूचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार वाकडमध्ये घडला. आपल्याकडे मोहित करण्यासाठी पत्नीने त्याला स्वत:ची नखे भाजून त्याची पूड खायला घातली. मायाजाल नावाची वस्तू पाण्यात मिसळून प्यायला दिली. त्यामुळे पतीला पोटदुखीचा विकार जडला होता. पत्नीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग पाहिल्यावर हा सगळा प्रकार पतीला समजला. (Pimpri Chinchwad)
योगेश शिवाजी अपुणे (वय ३३, रा. काळेवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांची पत्नी सोनाली (वय २७), सासरे गोपाळ लिंबाराव शिंदे (वय ५५), सासू शकुंतला शिंदे (वय ५०) यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर वाकड पोलिसात (Wakad Police) गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
'सीविक मिरर’शी बोलताना योगेश म्हणाले की, आमचे २०१५ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर वर्षातच मतभेद होऊ लागल्याने बायको वेगळी राहू लागली. मात्र लोकअदालतीतील समुपदेशनामुळे तसेच आठ वर्षांची मुलगी असल्याने तिच्यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून पुन्हा एकत्र राहायला लागलो. त्यानंतर मला पोटदुखीचा विकार जडला. एकदा मी तिचा मोबाईल फोन तपासला असता त्यामध्ये रेकॉर्डिंग सापडले. त्यामध्ये सोनाली मोहोळ येथील बाबाजी शिंदे याच्याकडे जादूटोणा आणि काळ्या जादूची चौकशी करत होती. मला जेवणातून नखे आणि इतर काही वस्तू खायला घालण्याबाबत झालेल्या चर्चेचे रेकॉर्डिंगही मी ऐकले. याबाबत सोनालीला जाब विचारला असता तिने सासू-सासरे आणि मेव्हण्याला बोलावून घेतले. सासूने माझ्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. त्यांनी मला लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने मारहाण केली. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी सोनालीने दिली.
अतिरिक्त सरकारी वकील प्रेमचंद अग्रवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना गुन्ह्याचा सखोल तपास पोलिसांनी करण्याची मागणी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात जादूटोण्याचा दावा फेटाळून लावला. अन्नामध्ये नखे मिसळल्याचा कोणताही पुरावा नाही. देवाचे विधी करणे हे जादूटोणा करण्यासारखे नाही. काळ्या जादूशी संबंधित कोणतेही ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास करत असलेले वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंके म्हणाले की, संशयित सोनालीच्या फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंग आहे. ते तिच्या पतीने ऐकले होते. त्यामध्ये एका भोंदूबाबाचा ती सल्ला घेत होती. आम्ही बाबा शिंदे नावाच्या या भोंदूला अटक केली आहे. स्वत:ची नखे कापून तळून त्याची पावडर बनव. ती पावडर पतीच्या जेवणात मिसळल्यावर त्याचे मन तिच्याकडे मोहित होईल. हे रेकॉर्डिंग ऐकल्यावर पतीने जाब विचारला. त्यावरून त्याला मारहाण करण्यात आली.