Pune Crime News : वैशाली हॉटेलच्या मालकिणीला कोट्यवधींचा गंडा; पतीनेच केली फसवणूक

हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी आणि वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावावर बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल पांच कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 5 Oct 2023
  • 02:02 pm
Pune Crime News

वैशाली हॉटेलच्या मालकिणीला कोट्यवधींचा गंडा

परस्पर फ्लॅट तारण ठेवत पाच कोटींचा अपहार, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मण मोरे

हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी आणि वैशाली हॉटेलच्या (Hotel Vaishali) मालक निकिता शेट्टी (Nikita Shetti) यांच्या नावावर बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल पांच कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात निकिता यांच्या पतीसह कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि आर. आर. फायनान्सच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ डिसेंबर २०२२ ते आजअखेर फर्ग्युसन रस्त्यावरील 'निकीता हॉस्पिटॅलिटी एलएलपी' या फर्मच्या ऑफीसमध्ये घडली.

निकिता यांचे पती विश्वजीत विनायकराव जाधव (वय ४१, रा. आरंभ अपार्टमेंट, घोले रोड, शिवाजीनगर), आर. आर. फायनान्सचे डीएसए रवी परदेशी (रा. हांडेवाडी, सातवनगर, हडपसर), कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी (वय ४२, रा. न्याती युनिट्री, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निकीता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता शेट्टी या हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर वैशाली नावाचे हॉटेल आहे. फिर्यादीनुसार,  त्या जगन्नाथ शेट्टी ( निकिता यांचे वडील) यांच्या त्या वारस आहेत. त्या वडिलांना हॉटेल व्यवसायात मदत करीत होत्या. या काळात त्यांची विश्वजीत जाधव यांच्याशी ओळख झाली. त्यांचा १ मे २०१८ रोजी  विवाह झाला. त्यांना विनीष्का नावाची मुलगी आहे. लग्नानंतर जगन्नाथ शेटटी यांच्या सोबत विश्वजीत हे वैशालीच्या व्यवस्थापनाचे काम पाहत होते. विश्वजीत यांनी जगन्नाथ, निकीता यांचा विश्वास संपादन केला. जगन्नाथ शेटटी यांचे १९ डिसेंबर २०२१ रोजी निधन झाले. मृत्युपूर्वी त्यांनी पुर्ण मिळकत निकीता यांच्या नावे मृत्यूपत्राद्वारे केली होती. त्यानंतर ७ डिसेंबर २०२२ रोजी विश्वजीत यांनी रजिस्टेशन कार्यालयात जबरदस्तीने आपल्याकडून कुलमुखत्यार पत्र म्हणजे 'पॉवर ऑफ ॲटर्नी' करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विश्वजीत यांनी  'पॉवर ऑफ ॲटर्नी' चा गैरफायदा घेत मिळकत स्वतःच्या नावे करायला सुरुवात केली. तसेच निकितांच्या नावे असलेल्या बँकेमधील मुदत ठेवी (एफडी) मोडल्या. त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या पॉलीसीचे पैसे घेतले. जुलै २०२३ मध्ये कोटक महिंद्रा बँक, येरवडा शाखेमधून जनरल मॅनेजर राजेश चौधरी व त्यांचे सहकारी यांनी निकिता यांच्याशी संपर्क साधला. त्यांना जुलै महिन्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी निकिता यांनी बँकेकडुन कुठलेही कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी बँकेचे त्यांच्या नावे ५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. या कर्जाचे हप्ते फेडले नसल्याने ते कधी भरता अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी कोटक महिंद्रा, येरवडा शाखेत जाऊन चौकशी केली.

विश्वजीत यांनी आर आर फायनान्सचे एजंट रवी परदेशी व कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजर राजेश चौधरी यांच्याशी संगनमत करून त्यांचा फ्लॅट तारण ठेवला. त्याआधारे निकिता यांच्या नावे कोटक महिंद्रा बँकेकडुन ५ कोटींचे कर्ज मंजुर करुन घेतले. त्यापैकी कर्जाची एकुण रक्कम ४ कोटी ९७ लाख ५ हजार रुपये १ डिसेंबर २०२२ रोजी निकिता यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर ८ डिसेंबर २०२२ रोजी ४ कोटी ९३ लाख ७ हजार रुपये विश्वजीत यांनी त्यांच्या ॲक्सीस बँकेच्या प्रभात रोड शाखेवर आरटीजीएसद्वारे निकिता यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या सहीने वळती करुन घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानंतर, निकिता यांनी कोटक महिंद्रा बँकेतुन कर्जासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्षात पाहणी केली. कर्जाच्या अर्जावर त्यांची सही नसुन अर्धवट माहिती भरल्याचे समोर आले. त्यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या कर्ज प्रकरणामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे कोणीही अधिकारी अथवा बँकेने नेमलेल्या एजंटनी त्यांची चौकशी केली नाही. या  कर्जप्रकरणातील कागदपत्रावर त्यांची स्वाक्षरी नव्हती. कोणत्याही प्रकारची पडताळणी करण्यात आली नाही. मुलाखत देखील घेतली नाही अगर शहानिशा केली नाही. कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. हे कर्ज प्रकरणाच्या अर्जावर 'निकीता हॉस्पिटॅलिटी एलएलपी'चा बनावट शिक्का मारण्यात आल्याचे निदर्शनास आले.

 निकिता यांच्या नावावर असणाऱ्या “निकीता हॉस्पिटॅलिटी एलएलपी” या फर्मच्या ऑफीसमध्ये बसुन त्यांचे पती विश्वजीत जाधव यांनी कोटक महिंद्रा बँकेतील अधिकारी राजेश चौधरी, डीएसए रवि परदेशी यांच्या मदतीने संगनमत करुन परस्पर त्यांच्या नावावर ५ कोटीचे कर्ज घेतले. यासाठी त्यांच्या को-या चेकचा वापर करुन स्वतः च्या नावावर वळते करुन अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. या कर्ज प्रक्रियेसाठी त्यांच्या मालकीचा फ्लॅट परवानगीशिवाय तारण ठेऊन त्या बदल्यात कर्ज घेतल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest