फक्त दोन हजार रुपयांत विकली पोटची पोरगी
लक्ष्मण मोरे
अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये चार वर्षांच्या पोटच्या मुलीला विकण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या मुलीला भिक्षा मागण्यासाठी विकत घेण्यात आले असून, त्याला संबंधित समाजाच्या जातपंचायतीने मान्यता दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी १५ जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलाबाई अनिल पवार, अनिल हिरा पवार, अनिल जाधव, लक्ष्मी अनिल जाधव, मुश्या उर्फ लक्ष्मण भगवान निंबाळकर, अण्णा बाळू पवार, रामा निंबाळकर, नारायण पवार, बाळू पवार, माऱ्या पवार, पंड्या पवार, अण्णा निंबाळकर, शेट्ट्यांना पवार, सोनिया पवार आणि ढेऱ्या पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील अनिल जाधव आणि त्याची पत्नी लक्ष्मी अनिल जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वकील शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार येरवडा आणि बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी घडला.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी एकाच समाजाचे आहेत. ते डोक्यावर मरीआईचा गाडा घेऊन गावोगावी फिरतात. देवीची गाणी गाऊन आणि आपली कला सादर करून मिळेल ते मागून उपजीविका चालवितात. अटक करण्यात आलेले अनिल जाधव आणि लक्ष्मी जाधव यांनी नीलाबाई पवार आणि तिच्या पतीकडून त्यांची चार वर्षांची मुलगी दोन हजार रुपयांना विकत घेतली असल्याची माहिती फिर्यादी ॲड. लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नीलाबाई आणि तिचा पती अनिल पवार यांना सात मुली आहेत. यातील चार वर्षांची मुलगी त्यांनी दोन हजार रुपयांना विकल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, लक्ष्मी जाधव आणि अनिल जाधव या दोघांनी ही मुलगी आपण विकत घेतली नसून दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. दत्तक घेत असताना समजुतीचा करारनामा त्यांनी केला आहे आणि त्यावेळी जात पंचायतीची परवानगीदेखील घेण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
याच समाजातील एका व्यक्तीने लोखंडे यांच्याशी संपर्क साधून या मुलीची दोन हजार रुपयांना विक्री झाल्याचे सांगितले. सध्या हे सर्व आरोपी रामवाडी येथील साकोरे वस्ती या ठिकाणी राहतात. त्यांचे मूळ गाव बारामती तालुक्यातील सुपे आहे. त्या ठिकाणी त्यांची वसती आहे. तिथून वेगवेगळ्या गटांनी विविध कुटुंब विभक्त होऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन भिक्षेकरीचे काम करीत आहेत. पोलिसांकडे या संदर्भात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करीत जाधव दाम्पत्याला अटक केली. पीडित मुलीला ताब्यात घेत तिला महिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. महिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार तिला ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या सोफोस या संस्थेमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे. पीडित मुलीचे आई-वडील मूळचे नगर जिल्ह्यातील असून, तिची आजी लोहगाव येथे राहते.
दरम्यान, या मुलीला जात पंचायतीच्या पंचांच्या सहमतीने बेकायदा दोन हजार रुपयांना भीक मागण्याच्या उद्देशाने विकण्यात आले असून तिला गुलाम बनवून जबरदस्तीने भीक मागायला भाग पाडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला असून, दोघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नांगरे करीत आहेत.
प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने तत्काळ कारवाईला सुरुवात केली असून संबंधित मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले होते. त्यांच्या आदेशाने सध्या तिला सोफोस या संस्थेमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे. यासोबतच अन्य आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून , एका दाम्पत्याला अटक केली आहे. या प्रकरणातील सर्व तथ्ये आम्ही पडताळत आहोत.
- दत्तात्रेय नांगरे, पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी