संग्रहित छायाचित्र
लक्ष्मण मोरे
‘एमबीए’ चे शिक्षण घेताना चालकाची नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्या मालकिणीच्या वृद्धत्वाचा फायदा उचलत बनावट सह्या करून तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केली. या मालकिणीच्या मृत्युपश्चात त्यांच्या भाच्याने बँकेत चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना २०१७ सालापासून आजवर घडली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजय राजाराम भडकवाड (वय ३०, रा. ई-बिल्डिंग, मॅजेस्टी मोरया सोसायटी, सुखसागरनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सायरस बी. श्रॉफ (वय ६२, रा. गंगा सॅटेलाईट सोसायटी, केदारी पेट्रोल पंपाजवळ, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. अजय भडकवाड हा फिर्यादी सायरस यांची मावशी अर्नी दिनशा शेठना (वय ८०) यांच्याकडे गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. तसेच, त्यांचे बँक व्यवहार आणि काही प्रमाणात आर्थिक हिशोबाच्या कामात मदत करीत होता. अर्नी यांचे २०२२ साली वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. फिर्यादी सायरस हे जर्मनीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर ते गेल्या काही महिन्यांपासून भारतात राहतात. अर्नी शेठना यांनी सायरस यांच्यासह जनता सहकारी बँकेमध्ये बजाज फिनसर्व्ह कंपनीचे ३६०० शेअर्स घेतलेले होते.
अर्नी शेठना यांचा तरुणपणात घटस्फोट झालेला होता. तेव्हापासून त्या सिटी स. नंबर २/१, अर्देशीर बाग, अर्देशीर इराणी रस्ता, न्यू नाना पेठ) या ठिकाणी वडिलांच्या घरी राहात होत्या. त्यांना मुलबाळ नसल्याने त्या एकट्याच राहात होत्या. त्यांना आणखी चार बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीचा सायरस हा मुलगा आहे. अर्नी यांना वारसदार नसल्याने त्यांनी सायरस यांनाच वारसदार नेमले होते. अर्नी या ७६ वयाच्या असताना आरोपी भडकवाड त्यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला लागला. त्यावेळी तो 'एमबीए' चे शिक्षण घेत होता. तो २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये त्यांच्याकडे काम करत होता.
अर्नी आणि सायरस यांच्या नावे जनता सहकारी बॅंकेतील डिमॅट अकांउटच्या क्लाईट आयडीचा वापर करत बजाज फिन्सर्व्ह कंपनीचे एकूण ३६०० शेअर्स त्यांच्या संमतीशिवाय भडकवाडने स्वत:च्या नावावर वर्ग करून घेतले. यासाठी फिर्यादी सायरस यांची खोटी सही केली. त्यामधून प्राप्त झालेल्या रकमेपैकी अंदाजे १ कोटी ६४ लाख रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तसेच अर्नी यांच्या निधनानंतर त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, त्यांचे सोन्याचे दागिने व इतर वस्तूही लंपास केल्या. अर्नी यांच्या नावावर स्थावर मालमत्ता नव्हती. अन्यथा त्याने ही मालमत्ताही बळकावली असती.
अर्नी यांच्या निधनानंतर सायरस कायदेशीर वारस असल्याने ते आवश्यक त्या ठिकाणी वारसनोंद करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अर्नी आणि त्यांच्या नावावर संयुक्तपणे जनता सहकारी बँकेचे शेअर्स होते. या शेअर्सबाबत वारसनोंदणी करण्यासाठी ते बँकेत गेले असता भडकवाड याने बनावट सह्या करून ते स्वत:च्या नावावर वर्ग करून घेतल्याचे समोर आले.
सायरस यांनी तत्काळ पोलिसांकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. भडकवाड हा विवाहित आहे. त्याने या १ कोटी ६४ लाख रुपयांचे नेमके काय केले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्याने यातून कुठे मालमत्ता खरेदी केली किंवा कुठे गुंतवणूक केली का याचा पोलीस धांडोळा घेत आहेत.
वृद्ध महिला अर्नी शेठना यांच्याकडे काम करणारा आरोपी अजय भडकवाड याने बनावट सह्या करून बँकेतील ३६०० शेअर्स परस्पर स्वत:च्या नावावर वर्ग करून घेतले. त्यामधून १ कोटी ६४ लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत अर्नी यांच्या भाच्याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
- मीरा त्र्यंबके, उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी