संग्रहित छायाचित्र
दोन भाविकांमध्ये मंदिराच्या मालकीवरून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (१९ सप्टेंबर) रात्री ९ ला हडपसर येथील शिंदे वस्तीत असलेल्या देवीच्या मंदिरात ही तुंबळ हाणामारी झाली आहे.
या प्रकरणी दोन्ही जखमी भाविकांनी परस्परांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. नीलेश रामसिंग कामठे आणि प्रसन्न प्रकाश कामठे अशी तक्रादारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान देवीच्या मंदिरात नीलेश रामसिंग कामठे (वय २१ रा. शिंदे वस्ती, हडपसर) गेले होते. त्यांच्या घराशेजारी राहणारे प्रसन्न कामठे आणि प्रसाद कामठे यांनी देवीचे मंदिर हे आमच्या मालकीचे असल्याचे सांगून हक्क सांगण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी देवीच्या मंदिरावर आमचा देखील अधिकार असल्याचे नीलेश यांच्या आईने सांगितले. त्यावेळी प्रसन्न कामठे व प्रसाद कामठे यांनी नीलेशच्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर नीलेशने आईला का शिवीगाळ करीत आहे अशी विचारणा केली. त्यावेळी प्रसन्न कामठेने त्याच्या हातातील धारदार हत्याराने नीलेशच्या उजव्या हातावर वार केला. प्रसाद कामठेने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. झालेल्या हाणामारीत नीलेशच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचाराकरीता पाठविले. हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना सांगितले की, दोघांमध्ये मंदिराच्या मालकीवरून वाद झाला. दोघांच्याही तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत.