Puncture Fraud : आता 'पंक्चर फ्रॉड', एकाच टायरमध्ये १६ पंक्चर असल्याचे सांगून घातला १६०० रुपयांना गंडा

पुण्यामध्ये 'पंक्चर फ्रॉड' नावाचा एक नवीन 'फ्रॉड' उघडकीस येत आहे. या 'फ्रॉड' मध्ये गाडीचे चाक पंक्चर असल्याचे सांगत वाहनचालकांना दुकानात नेले जाते. तेथे गेल्यावर खूप पंक्चर असल्याचे सांगत खिसा खाली केला जातो.

Puncture Fraud : आता'पंक्चर फ्रॉड', एकाच टायरमध्ये १६ पंक्चर असल्याचे सांगून घातला १६०० रुपयांना गंडा

आता 'पंक्चर फ्रॉड', एकाच टायरमध्ये १६ पंक्चर असल्याचे सांगून घातला १६०० रुपयांना गंडा

लष्करी जवानाला हवा कमी असल्याचे सांगून नेले दुकानात, फिर्याद दाखल होताच दुकानदार पसार

पुण्यामध्ये 'पंक्चर फ्रॉड' नावाचा एक नवीन 'फ्रॉड' उघडकीस येत आहे. या 'फ्रॉड' मध्ये गाडीचे चाक पंक्चर असल्याचे सांगत वाहनचालकांना दुकानात नेले जाते. तेथे गेल्यावर खूप पंक्चर असल्याचे सांगत खिसा खाली केला जातो. असाच एक प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. दुचाकीवरुन कमांड हॉस्पिटलकडे निघालेल्या लष्करी जवानाला गाडीत हवा कमी असल्याचे सांगून दुकानात नेले. तेथे टायरमध्ये तब्बल १६ पंक्चर असल्याचे सांगत त्यांच्याकडून १६०० रुपये उकळण्यात आले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच या जवानाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पंक्चर दुकानदार पसार झाला आहे.

या प्रकरणी पंक्चर दुकानदारासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भादवि कलम ४२०, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नरेश पाल (वय ३९, रा. एसएमक्यू नंबर ७९/२, विसावा कॉम्प्लेक्स, एअरफोर्स स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते पावणे बाराच्या सुमारास पुणे नगर रस्त्यावरील रामवाडी जकात नाक्याजवळच्या पुलाजवळ घडला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश पाल हे विमाननगरमधून लष्कर परिसरातील कमांड हॉस्पिटलकडे चालले होते. रामवाडी जकात नाक्याजवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना 'तुमच्या  मोटरसायकलच्या मागच्या चाकामध्ये हवा कमी आहे. समोरील पंक्चर दुकानात जाऊन पंक्चर काढून घ्या' असे सांगितले. पंक्चर दुकानामध्ये आणखी दोन अनोळखी व्यक्ती बसलेल्या होत्या. नरेश पाल यांच्या गाडीचा टायर तेथील तीन आरोपींनी तपासला. त्यांची गाडी पंक्चर असल्याचे त्यांना खोटे सांगण्यात आले. टायरमध्ये सोळा पंक्चर असल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले.

त्यांना तातडीने रुग्णालयात जायचे असल्याने त्यांनी फार विचार न करता पंक्चर दुरुस्त करायला सांगितले. आरोपींनी १६ पंक्चर काढल्याचे भासवित त्यांच्याकडून १६०० रुपये उकळले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ओळखीच्या पंक्चरवाल्याकडे गाडी दाखविली. त्याने टायर पाहिल्यानंतर पूर्ण टायरच खराब झाल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबत सहायक निरीक्षक आळेकर म्हणाले की, या गुन्ह्यामधील संशयीत आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या तिघेही पसार झाले आहेत. अशा प्रकारची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. पंक्चर काढायला गेल्यानंतर नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

याबाबत महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त माधव जगताप म्हणाले, की 'पंक्चरची दुकाने जर टपरीमध्ये असतील त्यांचे परवाने आम्ही तपासून पाहू. जर, परवाने असतील आणि भाड्याने दिलेले असतील तर त्यांचे परवाने आम्ही जप्त करू. असे प्रकार घडत असतील तर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

बिबवेवाडी येथील रहिवासी प्रयाग जाधव म्हणाले की, वाहने पंक्चर होणे हे नित्याचीच बाब झाली आहे. याकडे वाहनचालक फार गांभीर्याने पहात नाहीत. मात्र, वारंवार वाहने पंक्चर होणे म्हणजे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे. या पंक्चर दुकानदारांची तपासणी व्हायला हवी.

असा होतो फ्रॉड...

वाहनचालकांना सावज म्हणून हेरले जाते. पंक्चर दुकानदारांचा एक माणूस रस्त्यावरून फिरत असतो. वाहनचालकांना गाठून त्यांचे पाठीमागील चाक पंक्चर असल्याचे किंवा हवा कमी असल्याचे सांगितले जाते. त्यांना सोबत पंक्चर दुकानात नेले जाते. त्याठिकाणी बाटलीमध्ये भरलेले शॅम्पूयुक्त साबणाचे पाणी टायरवर टाकले जाते. त्यामधून लगेच बुडबुडे येऊ लागतात. त्यामुळे वाहनचालकालाही खरोखरीच आपले वाहन पंक्चर असल्याची खात्री पटते. पंक्चर दुकान चालक इथेच चलाखी करून जास्ती पंक्चर असल्याचे सांगतात. वाहनचालक घाईत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून पैसे देऊन निघून जातात. यामधून दुकानदार दिवसाला पाच ते दहा हजार रुपयांचा धंदा करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे खूप जास्त पंक्चर असल्याची बतावणी करीत नवीन टायर किंवा टयूब घेण्यास प्रवृत्त करतात. जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळेल.नवीन टायर नसेल घ्यायचा तर अनेकदा जुन्या टायरसाठीही विचारले जाते.

जुलैमध्ये  झाले होते १७ पंक्चर, उकळले १७०० रुपये

अशाच प्रकारचा आणखीन एक गुन्हा यापूर्वी २९ जुलै २०२३ रोजी दाखल करण्यात आलेला होता. सौरभ अरविंदकुमार कौशल हे त्यांच्या पत्नीसह पुणे नगर रस्त्यावरून २४ जुलै रोजी जात होते. वडगाव शेरी येथील आर्मीगेट जवळ असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने 'दुचाकीमधील हवा कमी आहे' असे सांगत  एका पंक्चरवाल्याला बोलावले. त्यानंतर त्याने गाडीच्या टायरमध्ये १७ पंक्चर असल्याचे सांगत त्यांच्याकडून १७०० रुपये उकळले होते. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भादवि ४२०, ४२९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

'डू'ज अँड 'डोन्टस्'

>>  नियमितपणे टायरमधील हवा चेक करा.

>>  पंक्चर असल्याचे जाणवल्यास नेहमीच्या दुकानदाराला दाखवा.

>>  टायर तपासणीवेळी दुकानदाराच्या हालचाली, हत्यारांवर नजर ठेवा.

>>  पंक्चर असल्याचे सांगितल्यावर एकदा हवा भरून गाडी चालवून बघा.

>>  पंक्चर दुकानदाराच्या सांगण्यावर लगेच विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका.

>>  नवीन टायर अथवा टयूब विकत घेण्याचा सल्ला दिल्यास त्याला लगेच प्रतिसाद

 देऊ नका.

>>  पंक्चर दुकानातून जुने टायर घेणे टाळा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest