कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला
पुण्यातील मुंढवा येथील एका रेस्टॉरंटमध्ये तीन जणांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, प्रवेश नाकारण्याच्या कारणावरून तीन जणांना रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली.
धीरेंद्र चौहान (वय २७) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी धीरेंद्र यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारा आरोपी आबिद युसूफ खान (वय २०, रा. भवानी पेठ, लोहियानगर झोपडपट्टी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरेंद्र आणि त्यांचे सहकारी विक्रम उदयन हे दोघे रात्री २ वाजता रेस्टॉरंट बंद करून त्यांच्या खोलीत जात होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी त्यांना अडवले. त्यांना आदल्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. हाच राग मनात धरून दोन जणांना चौहान यांच्या सहकाऱ्याला पकडले. तर एका जणाने चौहान यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
या हल्ल्यात चौहाने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे दुचाकीच्या नंबर प्लेटच्या आधारे पोलीसांनी एकाला शोधून काढत अटक केली आहे. तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. त्यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.