चोरीच्या दुचाकींची अशीही मनी ट्रान्स्फर योजना!

चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती मनी ट्रान्स्फर सेंटर येथे ठेवल्यानंतर पैसे घेऊन पसार होण्याचा वाहन चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 12 Sep 2023
  • 12:22 pm
Pune Crime News

चोरीच्या दुचाकींची अशीही मनी ट्रान्स्फर योजना!

चोरलेली वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता त्यांचा असाही वापर, देहूरोड पोलिसांनी केली दोघांना अटक

चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती मनी ट्रान्स्फर सेंटर येथे ठेवल्यानंतर पैसे घेऊन पसार होण्याचा वाहन चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

बीड येथील दोन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमधून चोरलेल्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. अमृत भाऊसाहेब देशमुख (वय ४६, रा. कान्नापूर, सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड), फारूक शब्बीर शेख (वय ३७, रा. मोहा रोड, सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना देहूरोड पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे आढळले. चोरट्यांची ओळख निष्पन्न करून पोलिसांनी त्यांना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्या चोरट्यांकडून देहूरोड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, छत्रपती संभाजीनगर, घोडेगाव, अहमदनगर येथून चोरी केलेल्या आठ लाखांच्या ११ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

चोरट्यांनी सहा दुचाकी आळंदी-मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरुळी परिसरातील वेगवेगळ्या मनी ट्रान्स्फर सेंटरसमोर पार्क केलेल्या होत्या. शहरातून दुचाकी चोरायच्या, त्या दुचाकी एखाद्या मनी ट्रान्स्फर सेंटरसमोर लावायच्या, त्यानंतर मनी  ट्रान्स्फर सेंटरमधून सुरुवातीला २० ते २५ हजार रुपये रक्कम आपल्या खात्यात  ट्रान्स्फर करून घ्यायची. त्यानंतर रोख रक्कम देण्यासाठी नसल्याचे सांगायचे. एटीएममधून पैसे काढून घेऊन येतो, माझी दुचाकी इथेच आहे, असा बहाणा करून चोरटे तिथून धूम ठोकत आणि थेट गाव गाठत. अशाप्रकारे त्यांनी सहा दुचाकी मनी ट्रान्स्फर  सेंटरमध्ये लावल्या होत्या. इतर पाच दुचाकी त्यांनी आळंदी येथे लपवून ठेवल्या होत्या.

या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील तीन, आळंदीतील तीन, सांगवी, हिंजवडी, क्रांती चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर, सोनई पोलीस स्टेशन अहमदनगर येथील प्रत्येकी एक असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित एका दुचाकीच्या मालकाचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत.

उद्योगनगरीत दिवसाला  ४ दुचाकी चोरीस

पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून दिवसाला सरासरी किमान ४ दुचाकींची चोरी होते. त्याबाबत तक्रार दिल्यानंतर तपासाचा हा वेग खूपच कमी आहे. कमी किमतीत दुचाकींची गावाकडे विक्री तसेच वाहनांचे सुट्टे भाग करून त्यांची विक्री होत असल्याने आणि शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अद्याप पोलिसांच्या कामी येत नसल्याने अशा प्रकरणांच्या तपासात अनेक अडथळे येत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest