Rice Black Market : शाळेच्या मुलांच्या तोंडचा घास पळवला... शालेय पोषण आहाराचा लाखोंचा तांदूळ काळ्या बाजारात

पुणे : प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा शालेय पोषण आहाराचा तब्बल ९ लाख रुपयांचा तांदूळ काळा बाजारात (Rice black market) विक्री करता नेण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 10:39 am
Rice Black Market

संग्रहित छायाचित्र

पुणे : प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा शालेय पोषण आहाराचा तब्बल ९ लाख रुपयांचा तांदूळ काळा बाजारात (Rice black market) विक्री करता नेण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या (Crime Branch) युनिट एकच्या पथकाने कारवाई करीत हा तांदूळ जप्त केला आहे. ही कारवाई वडगाव बुद्रुक धायरी फाटा येथे करण्यात आली. (Pune Crime)

याप्रकरणी अजिनाथ सदाशिव सानप (वय ४१, रा. सरनोबतवाडी, कोल्हापूर), रामराज उर्फ रामभाऊ मोतीराम गोवेकर (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष रामदास फाटके (वय ३८, रा. विस्टा लक्झरीया, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड धायरी येथे एका शाळेमध्ये संस्कार महिला मंडळाच्या वतीने केंद्रीय स्वयंपाक गृह चालविले जाते. आरोपी सानप आणि गोवेकर यांच्यामार्फत हे केंद्र चालविले जाते. त्यांना या शाळेमधील पहिले ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत काम मिळालेले आहे.

त्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शासनामार्फत विनाशुल्क तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. आरोपींकडून शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सिंहगड रस्त्यावरील आशीर्वाद बिल्डिंगमध्ये छापा टाकला. याठिकाणी आठ लाख ९६ हजार दोनशे रुपयांच्या तांदूळाचा अपहार केला जात असल्याचे निदर्शनास आले. हा तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यासाठी वाहनात भरून नेला जात असतानाच पोलिसांनी कारवाई करून हा तांदूळ ताब्यात घेतला. पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest