संग्रहित छायाचित्र
पुण्यातील लोणी-काळभोर परिसरातून मेफेड्रॉन (एम.डी.) आणि बंटा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता आलेल्या परप्रांतीय तरुणाला कारसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २६ लाख ३० हजार २०० रुपये किमतीचा १०१ ग्रॅम ०१० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) तसेच ६१० ग्रॅम बंटा व इतर ऐवज असा एकुण ३६ लाख ४६ हजार २०० रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई ३१ मे रोजी पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ने केली आहे.
जितेंद्र सतीशकुमार दुआ (वय ४०, रा. ड्रिम्स निवारा सोसायटी, उरुळी कांचन, पुणे, मुळ रा. मुखर्जी पार्क, तिलकरनगर, वेस्ट दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला एक परप्रांतीय इसम हा मेफेड्रॉन (एम.डी.) व बंटा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता उरळी कांचन रोडवरील प्रयागधाम ट्रस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल बस स्टॉप जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून जितेंद्रला ताब्यात घेतले.
जितेंद्रला ताब्यात घेवून त्याच्या कारची झडती घेण्यात आली. यावेळी कारमध्ये एकूण ३६ लाख ४६ हजार २००रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. त्यामध्ये २० ग्रॅम ६७० मिलीग्रॅम पांढरे क्रिस्टल स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ ४ लाख १३ हजार ४०० रुपये किमतीचा, ८० ग्रॅम ३४० मिलीग्रॅम ब्राऊन क्रिस्टल स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ १६ लाख ०६ हजार ८०० रुपये किमतीचा, तसेच ६१० मिलीग्रॅम बंटा हा अंमली पदार्थ ६ लाख १० हजार रुपये किमतीचा, ४ हजार रुपये रोख रक्कम, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा २ हजार रुपयांचे आणि ०३ मोबाईल फोन १० हजार रुपयांचे, एक चारचाकी गाडी असा ऐवज एम. डी. आणि बंटा या अंमली पदार्थासह पोलीसांना जप्त केला आहे.