संग्रहित छायाचित्र
मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्काच्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ तिमप्पा धनगर असे आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असून तो गुन्हा घडल्यापासून फरार होता.
गणेश संजय पोळ (वय २९, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोळ हे मजुरीचे काम करतात. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता ते दुचाकीवरून घरी जात असताना, ताडीवाला रोड येथील मारुती मंदिर चौकात सौरभ तिमप्पा धनगर, आकाश राहुल पंडित ऊर्फ झिंग्या आणि साहिल राजू वाघमारे ऊर्फ सोन्या यांनी त्यांची दुचाकी अडवली.
त्यानंतर आरोपींनी फायटर, लाकडी बांबू आणि दगडांचा वापर करून पोळ यांना मारहाण केली. या हल्ल्यात पोळ गंभीर जखमी झाले. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. परंतु सौरभ धनगर गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता.
पोलीसांना बातमीदाराच्या माहितीवरून सौरभ धनगर हा कर्नाटकातील रायचूर येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांच्या पथकाने त्वरित कारवाई करत ६ डिसेंबर रोजी रायचूर येथून आरोपी धनगरला ताब्यात घेतले.
सात डिसेंबर रोजी सौरभ धनगर याला बंडगार्डन पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आणि अटक करण्यात आली.