शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा कट;शरद मालपोटे, संदेश कडू यांना बेड्या
पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना अटक झालेली असली तरी डेक यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शरद शिवाजी मालपोटे (वय २९, रा. सुतारदारा, कोथरूड ) आणि संदेश लहू कडू (वय २४, रा. काळूबाई कॉलनी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ५ जानेवारी २०२४ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ याच्यावर ३ जणांनी गोळ्या झाडल्या होत्या.
या घटनेला आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. अशातच शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांनीही शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठी या दोघांनी पिस्तूल आणले होते. हे दोघेही संधीच्या शोधात होते. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्या या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी या दोघांना सापळा रचून अटक केली. कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता.
तपासादरम्यान या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले. मुळशीतील विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह १७ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे यांनी केली.