संग्रहित छायाचित्र
थेऊर रस्ता येथे 27 डिसेंबरला सहा ते सात व्यक्तींनी एका महिलेच्या डोक्यात दगड मारून , तिच्या पतीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली होती. दगड मारल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अजून दोघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
मयूर शंकर जाधव (वय ३२, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे), प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३, रा. केळगाव, चिंबळी-आळंदी रस्ता, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात आरोपी मोटारीतून आले होते. मोकळ्या जागेत ते लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी त्या परिसरातील रखवालदार अक्षय चव्हाण यांनी आरोपींना हटकले. चव्हाण याच्या दिशेने आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच त्यांची पत्नी शीतल यांना दगड फेकून मारला. या घटनेमध्ये शीतल या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला पोलिसांनी भानूदास शेलार, अजय मुंढे, सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल देखील जप्त करण्यात आले होते. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून शोध घेत होते. मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पोलिसांनी खेड-शिवापूर येथून आरोपी मयूर जाधव आणि प्रथमेश वाहिले यांना सापळा रचून पकडण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिडवई, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट ६, एडीएस १, एडीएस २ यांच्याकडील अंमलदार सहायक फौजदार दिनकर लोखंडे, सहायक फौजदार राजेश लोखंडे, पोलीस हवालदार गणेश ढगे, प्रदीप राठोड, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पोलीस अंमलदार महेश पाटील, संदीप येळे, विनायक येवले, समिर पिलाणे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे यांनी केली.