गाडीवर पावती टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी मरकळ चौक, आळंदी येथे घडली.
विजय नामदेव जरे (वय ३३, रा. गोपाळपुरा, चाकण चौक आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश कान्छु वाडेकर (वय ५४) यांनी शुक्रवारी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर हे मरकळ चौक, आळंदी या ठिकाणी वाहतक नियमन करीत होते. त्यावेळी आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी यापूर्वी त्याच्या गाडीवर पावती टाकल्याचा राग मनामध्ये धरुन, तुला माहित नाही का मी स्थानिक आहे.
गाडीवर तु पावती का करतो तुला इथे राहायचे नाही का, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी घातलेल्या युनिफॉर्मच्या शर्टाची गचांडी पकडुन शर्टाची बटने तोडली. वाहतूक पोलीस वाडेकर यांच्या गालावर जोरात हाताने चापट मारली. त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पन्हा त्याने फिर्यादीचे डोक्यात व छातीवर लाथा व बुक्याने मारहान केली. या घटनेमुळे मरकळ चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान आळंदी पोलिसांनी आरोपीला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली असून अधिक तपास सरू आहे.