Loni Kalbhor : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एकाचा खून

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाचा खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 5 Jan 2025
  • 04:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाचा खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. 

नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय ३९, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याप्रकरणी पोलीस शिपाई केतन उत्तम धेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबरला योगेश काळभोर आणि सोमनाथ जाधव हे लोणी काळभोर मधील रायवाडी परिसरात असलेल्या दत्तात्रय कांबळे  याच्या खोलीत दारू पित होते. त्यावेळी आरोपी नंदू त्या ठिकाणी आला. त्याने योगेशला शिवीगाळ केली. आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे का दिले नाही अशी विचारणा त्याने केली. त्यानंतर त्याने धक्काबुक्की केली. त्या दोघांची तिथे झटापट झाली. यादरम्यान नंदूने योगेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. योगेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू ठेवला. घटनास्थळी हजर असलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोमनाथ जाधव  याच्यासोबतच अजून दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत नंदूने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून योगेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याच्या खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी नंदू म्हात्रे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Share this story

Latest