संग्रहित छायाचित्र
मला माफ करा... अशी पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत सावकारी व्याजाच्या विळख्यात अडकलेल्या एका इसमाने आपले जीवन संपविले. सावकारांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगरमध्ये घडली. मृत्यूपूर्वी सदर इसमाने व्हीडीओद्वारे आपली व्यथा आणि सावकारांनी दिलेल्या त्रासाची कैफियत मांडली.
राजू नारायण राजभर (वय ४५, रा. साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर (वय १९) यांनी शुक्रवारी (दि. ३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे (रा. घरकुल सोसायटी, चिखली), महादेव फुले (रा. आनंद नगर चिंचवड स्टेशन), राजीवकुमार ऊर्फ गुड्डु भैया (रा. पिंपळे सौदागर), आणि महिला आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे वडील राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुनदेखील त्याचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसुन तुला मारु, तुला कापून टाकू, अशा वारंवार धमक्या दिल्या. या धमक्यांमुळे ते सतत तणावात होते. हा तणाव असह्य झाल्याने त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
राजू राजबर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ५.२२ मिनिटांचा एक व्हीडीओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबस सविस्तर सांगितले आहे. व्हीडीओच्या शेवटी त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफीही मागितली आहे. तसेच दोन पानांची एक चिठ्ठीही लिहिली आहे. डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा मांडणाऱ्या राजूचा व्हिडिओ हृ्दय पिळवटून टाकणारा आहे. त्याचा व्हिडिओ आणि चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.