Pune Crime News : जीएसटीला ४९० कोटी रुपयांचा गंडा; तब्बल ५४ बनावट कंपन्यांमार्फत बेकायदा व्यवहार

अवघ्या २६ वर्षांच्या दोन तरुणांनी बनावट जीएसटी फर्म तयार करीत त्याआधारे बनावट बँक खाते तयार करून जीएसटी विभागाला तब्बल ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Sun, 5 Jan 2025
  • 01:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बनावट कागदपत्रांसह बनावट नावाने सीमकार्ड व बँक खाते

अवघ्या २६ वर्षांच्या दोन तरुणांनी बनावट जीएसटी फर्म तयार करीत त्याआधारे बनावट बँक खाते तयार करून जीएसटी विभागाला तब्बल ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान घडला. ही फसवणूक करण्याकरिता ५४ बनावट फर्म तयार करण्यात आल्या. तसेच, बनावट सीमकार्ड, बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करण्यात आले. जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिटचे लाभ घेऊन ही आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जीएसटीकडून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात राजस्थानच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश कुमार (वय २६, रा. देवडा जालोर, राजस्थान), विरेंद्र कुमार (वय २६, रा. मूर्तला गाला, बाडमेर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६ (३), ३३६(२), ३४०(२), ६१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वस्तू आणि सेवाकर आसूचना महासंचालक कार्यालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागीय युनिटचे वरिष्ठ आसूचना अधिकारी अनुराग श्रीवास्तव (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. संशयास्पद व्यवहारांच्या अनुषंगाने आर. के. एंटरप्राईजेस, एस. के एंटरप्राईजेस आणि श्री महालक्ष्मी इम्पेक्स या कंपन्यांच्या व्यवहारांची तपासणी सुरू करण्यात आली. आर. के. एंटरप्राईजेस व एस. के एंटरप्राईजेस या कंपन्या २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या, तर श्री महालक्ष्मी इम्पेक्स ही कंपनी २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेली होती. 

श्री महालक्ष्मी इम्पेक्स ही आर. के. एंटरप्राईजेस व एस. के एंटरप्राईजेस कंपन्यांची ग्राहक कंपनी आहे. या तपासणीमध्ये काही संशयास्पद व्यवहार आढळून आले. आर. के. एंटरप्राईजेस, एस. के. एंटरप्राईजेस व श्री महालक्ष्मी इम्पेक्स या कंपन्यांनी नव्याने रजिस्टर झाल्यापासून कमी वेळेत मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्रीचे व्यवहार केल्याचे आढळून आले. तसेच या कंपन्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिटचे लाभ घेत असल्याचे समोर आले. या कंपन्या केवळ वस्तूंची बिले काढत आहेत. परंतु, कुठल्याही वस्तूंचा व्यवहार करीत नसल्याचे दिसत होते. तसेच, आर. के. एंटरप्राईजेस, एस.के. एंटरप्राईजेस या कंपन्या गोवा येथे रजिस्टर केलेल्या होत्या. श्री महालक्ष्मी इम्पेक्स ही कंपनी चिंचवड येथे रजिस्टर करण्यात आलेली आहे. या कंपन्यांचे पत्तेसुद्धा खोटे असून प्रत्यक्षात या पत्त्यांवर कंपन्या आढळून आल्या नाहीत. जागामालकांशी नावाला भाडेकरार करण्यात आला. मात्र,  त्यानंतर कंपन्याच सुरू करण्यात आलेल्या नव्हत्या. या कंपन्या केवळ कागदोपत्री असून त्या प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या. या तीन कंपन्यांनी ९० कोटी ३७ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटची कोणतीही सेवा अगर वस्तूची प्रत्यक्ष खरेदी न करता फसवणूक करून लाभ घेतल्याचे समोर आले. त्यानंतर ७७ कोटी ६८ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट कोणतेही सेवा अगर वस्तूची विक्री न करता इतर कंपन्यांना ट्रान्सफर केले. त्यानंतर, या कंपन्यांचे जीएसटी रिटर्न फाईल टॅक्स, इंट्रेस्ट व लेट फीबाबत तपास सुरू करण्यात आला. हसमुख अगरवाल या नावाने बनावट पॅनकार्ड व आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करून युनियन बँक ऑफ इंडियाच्या जयपूर शाखेमध्ये खाते उघडण्यात आले होते. या खात्यावरून या तीन कंपन्यांसह एकूण ५४ कंपन्यांचे डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान जीएसटी संबंधित भरणा करण्यात येत होता.

या कंपनीचे इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्डदेखील तपासण्यात आले. त्यावेळी आर. के. एंटरप्राईजेस, एस. के. एंटरप्राईजेस व श्री महालक्ष्मी इम्पेक्स ह्या कंपन्या जीएसटी रिटर्न भरण्याकरिता तसेच  ई-वे बिल फाईल करण्याकरीता एकच ‘कॉमन आयपी अॅड्रेस’ वापरत असल्याचे निदर्शनास आले. कंपन्यांच्या आयपी ॲड्रेसवरून काही मोबाईल क्रमांक शोधण्यात आले. त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून दिनेश कुमारला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरझडतीमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे, जीएसटी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रे, वेगवेगळ्या बँकेचे कोरे धनादेश आदी साहित्य जप्त करण्यात आले. आर. के. एंटरप्राईजेस व एस. के. एंटरप्राईजेस या कंपन्यांच्या अधिकृत सिग्नेटरीकरिता दिनेश कुमार याने राहुल कुमार या बनावट नावाने आधारकार्ड व पॅनकार्ड आदी कागदपत्रे सादर करून मोबाईल नंबर रजिस्टर केला होता.

या बनावट कागदपत्रांच्या आधारे महावीर एंटरप्राईझेस या नावाने आणखी एक फर्म रजिस्टर केली. या चारही कंपन्या तोच चालवत होता. या चारही कंपन्यांनी एकूण १७२ कोटी ७८ लाख रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊन अन्य कंपन्यांना ट्रान्सफर केला. त्याला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. दरम्यान, आणखी एका पॅनकार्डवरून युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचा खाते क्रमांक मिळाला. हे खाते महावीर इंटरप्राईझेस या फर्मचे होते. त्याचा प्रोप्रायटर म्हणून हसमुख अगरवाल याचे नाव होते. या खात्यावरदेखील आर. के एंटरप्राईजेस, एस. के. एंटरप्राईजेस व श्री महालक्ष्मी इम्पेक्स व इतर बनावट फर्मशी संबंधित रक्कम आलेली असून काही फर्मला रक्कम दिली गेल्याचे दिसून आले. महावीर एंटरप्राईजेसचे खाते बनावट होते. या खात्याशी संबंधित मोबाईल नंबरचा शोध घेऊन कल्पेश कुमार याचे नाव निष्पन्न करण्यात आले. या नावाने आरोपी विरेंद्र कुमार हा वावरत असल्याचे समोर आले. त्यानेदेखील कल्पेश कुमार या नावाने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले होते. त्याने या बनावट कागदपत्रांचा वापर करून राधा कृष्णा ट्रेडर्स, हरी ओम इंटरप्राईझेस या दोन फर्म रजिस्टर केल्या. तो  एकूण ५४ बनावट फर्म ऑपरेट करत असल्याचे व त्यातून एकूण ४९६ कोटी २७ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट लाभ घेतल्याचे समोर आले. हा लाभ त्याने अन्य कंपन्यांना ट्रान्सफर केला. विरेंद्र कुमार याला अटक करण्यात आली.

दिनेश कुमार याने आर. के. एंटरप्राईजेस, एस. के. एंटरप्राईजेस, श्री महालक्ष्मी इम्पेक्स व महावीर इंटरप्राईझेस या ४ बनावट जीएसटी फर्म सुरू करून १७२ कोटी ७८ लाख रुपयांचा कर चुकवला. तर, विरेंद्र कुमार याने या चारही फर्मसह एकूण ५४ बनावट फर्म तयार करून त्यामधून ४९६ कोटी २७ लाख रुपयांची कर चुकवेगिरी करीत शासनाची आर्थिक फसवणूक केली.

Share this story

Latest