Pune News : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट

शहरात अनेक वर्षांनंतर पुन्हा सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, त्यांनी चांगलाच उच्छाद मांडलेला आहे. शहरात हे चोरटे महिलांना सॉफ्ट टार्गेट करत असून, एकट्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 5 Jan 2025
  • 01:52 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पेरणे फाटा परिसरात महिलांचे दागिने हिसकावले

शहरात अनेक वर्षांनंतर पुन्हा सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, त्यांनी चांगलाच उच्छाद मांडलेला आहे. शहरात हे चोरटे महिलांना सॉफ्ट टार्गेट करत असून, एकट्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटना पेरणे फाटा परिसरात घडलेल्या असून, १ जानेवारी रोजी विजयस्तंभ येथे अभिवादन करण्यास आलेल्या अनुयायांना चोरट्यांनी यावेळी टार्गेट केले आहे, तर तुळशीबाग तसेच कात्रजमध्ये देखील सोनसाखळी हिसकावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. 

चोरटे शहरात उच्छाद घालत असताना पोलिसांचे हात मात्र रिकामेच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, लोणीकंद पोलिसांना या टोळीतील एक चोरटा पकडण्यात यश आले आहे, पण त्याने चोरलेले दागिने साथीदारांना दिले असल्याचे समोर आले आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात पाच जणांच्या गळ्यातील सोन्याची चैन व महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्यात आले आहे. या सर्व घटना पीएमपीएल बसमध्ये चढत असताना गर्दीत घडल्या आहेत. दुपारी बारा ते चारपर्यंत या घटना घडल्या आहेत. यात चोरट्यांनी ४९ वर्षीय व्यक्तीची ६२ हजारांची सोनसाखळी, तीन महिला व एका व्यक्तीच्या गळ्यातील २ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. 

चोरट्यांनी पीएमपीएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन या चोऱ्या केल्या आहेत. पेरणे फाटा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. मोठी गर्दी येथे होते. ह्या गर्दीत चोरट्यांनी गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्या आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

तुळशीबागेत खरेदीच्या निमित्ताने आलेल्या महिलेच्या गळ्यातील ६१ हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत ५६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नाशिकमधील आहेत. त्या बुधवारी तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या तुळशीबागेतील विक्रेत्याकडून खरेदी करत होत्या. त्यावेळी गर्दीत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ६१ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. पोलीस कर्मचारी जाधव तपास करत आहेत. तसेच, कात्रज येथील राजस सोसायटी येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत ३७ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार मुलीला सोडण्यास सकाळी साडेसहाच्या सुमारास रोडच्या कडेला उभ्या होत्या. स्कूल व्हॅनची वाट पाहात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

Share this story

Latest