मांजरी: तहान भुकेने व्याकूळ महिलेवर मदतीच्या बहाण्याने अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने महिलेचा खून

तहान भुकेने व्याकूळ महिलेस मदतीच्या बहाणा करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेने विरोध केल्याने तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

संग्रहित छायाचित्र

फिरस्त्या महिलेचा खून, मांजरीतील धक्कादायक प्रकार दीड महिन्यांनी उघड, कोणतेही धागेदोरे नसताना केला खुनाचा उलगडा

तहान भुकेने व्याकूळ महिलेस मदतीच्या बहाणा करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेने विरोध केल्याने तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणतेही धागेदोरे नसताना मांजरी रेल्वेस्थानक परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी विक्रम उर्फ बाळू रघुनाथ जाधव (वय ३०, रा. खामगाव फाटा, उरळी कांचन, सोलापूर रस्ता, मूळ रा. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. ६ एप्रिल रोजी मांजरी रेल्वे स्थानक परिसरातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच खून झालेल्या ठिकाणी कोणतेही धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले नव्हते.  

या खुनाचा तपास पोलीसांकडून गेल्या दीड महिन्यापासून केला जात होता. आरोपी विक्रम एका रोपवाटिकेत काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याची पत्नी मूळगावी लातूरला गेली होती. हडपसर परिसरात तो ६ एप्रिल रोजी आला होता. त्यावेळी त्याला एक फिरस्ती महिला दिसली. तिने तहान आणि भूक लागल्याचे सांगितले. तिच्या पायात चप्पल नव्हती. तिने जाधवकडे चप्पल मागितली. तेव्हा माझे घर जवळ आहे, असे महिलेला सांगितले. तिला रिक्षातून मांजरी रेल्वे स्थानक परिसरात नेले. महिलेवर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो लातूरला पसार झाला. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर तो पुन्हा यवतला परत आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी हडपसर, मांजरी भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा सिरम इन्स्टिट्यूट परिसरातून आरोपी विक्रम जाधव एका महिलेला रिक्षातून घेऊन गेल्याचे चित्रीकरणात आढळून आले. पोलिसांनी शंभरहून जास्त ठिकाणचे चित्रीकरण तपासले. जाधव महिलेला ज्या रिक्षातून घेऊन गेला होता. त्या रिक्षाच्या पाठीमागील बाजूस एका शाळेची जाहिरात लावली होती. त्यानंतर पोलिसांनी जवळपास ३०० हून जास्त रिक्षाचालकांची चौकशी केली. तपासात महिलेचा खून करून पसार झालेला आरोपी जाधव यवत परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना दिली. खामगाव फाटा परिसरातून जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महिलेच्या खूनाची कबुली दिली.

"पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे नव्हते. शंभरहून जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. अत्याचारास विरोध केल्याने आरोपीने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. खून झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे."

 - संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest