संग्रहित छायाचित्र
पुण्यातील मंचर येथे लव जिहादचे प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे. मंचर येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला चार वर्षापुर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आता मुस्लीम तरुणावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी तरुण पुण्यातील येरवडा कारागृहात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीसांनी दिली आहे.
जावेद मुखतार शेख (वय २२, रा. मंचर एस कॉर्नर ता. आंबेगांव, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२४, ३४४, ३४ सह बा. लै. अ.प्र.का. कलम ४, ६, ८, १०, २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील पीडित तरुणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या भावाशी झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना माहिती मिळाल्यावर आरोपी तरुणाला समज देखील देण्यात आली होती. मात्र त्यानंतर आरोपी मुलाने पीडित मुलीस फुस लावून पळवून उत्तर प्रदेशला घेऊन गेला होता. त्या घटनेला जवळपास चार वर्षाचा कालावधी लोटला.
या चार वर्षाच्या काळात मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले, बीफ खाऊ घातले, तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिला नमाज करण्यास सांगितले, असे आरोप पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी केले आहेत. गेले सहा महिने आरोपी हा मंचर इथल्या घरी पीडित मुलीला घेऊन राहत होता. याबाबत २०१९मध्ये पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीसांत तक्रार दाखल होती. मात्र, पोलीसांत वारंवार हेलपाटे मारून देखील गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करत नव्हते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर द केरळा स्टोरी चित्रपट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी या मुलीची शोधाशोध केल्यानंतर पोलीसांनी देखील तपास सुरू केला. त्यानंतर आरोपी तरुण जावेद मुखतार शेख याच्यावर कलम ३६३ अन्वये मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मंचर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी पीडितेला पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. १९ मे रोजी पीडितेला वैद्यकीय उपरानानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीत नोंदवलेल्या जबाबानुसार जावेदने पीडित तरुणी अल्पवयीन असतानाही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापीत केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीसांनी जावेदला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर दाखल केलेल्या गुन्हात कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२४, ३४४, ३४ सह बा. लै. अ.प्र.का. कलम ४, ६, ८, १०, २१ हे कलम वाढवण्यात आले आहेत. सध्या आरोपी तरुणाची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.