लोणावळ्यात धबधब्याच्या प्रवाहात पाच जण वाहून गेले

लोणावळा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच सदस्य भुशी डॅम मध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली .

भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यातून ४ मुलांसह एक महिला वाहून गेली; तिघांचे मृतदेह शोधण्यात यश

भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या (रेल्वे चा वॉटर फॉल) प्रवाहातून ४ अल्पवयीन मुले व महिला पर्यटक धरणात वाहून गेली. या पर्यटकांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत सुरु होते. रविवारी (३० जून) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यापैकी एक महिला व दोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पथकाला यश आले आहे.

नूर शाहिस्ता अन्सारी (वय अंदाजे ३५), अमिना आदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६), अदनान अन्सारी (वय ४, सर्वजण राहणार सय्यदनगर, हडपसर पुणे) हे पाच जण पाण्यात वाहून गेले आहेत. यापैकी नुर शाहिस्ता अन्सारी व अमिना आदिल अन्सारी, उमेरा अन्सारी या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी पुण्याच्या हडपसर भागातील १७ ते १८ जणांचे अन्सारी कुटुंब आले होते.

रेल्वे विश्रांतीगृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यातून येणाऱ्या प्रवाहात अन्सारी कुटुंबातील साधारणः १५ ते १७ जण वर्षाविहाराचा आनंद घेत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास यामधील ४ लहान मुले पाण्यात वाहून जाऊ लागली, त्यांना वाचवण्यासाठी गेलेली नुर अन्सारी पाण्यात उतरली. तिच्या पाठोपाठ अन्य पाच ते सहा जण देखील पाण्यात उतरले. मात्र नूर आणि अन्य चौघेजण पाण्याच्या प्रवाहात थेट धरणाच्या जलाशयात वाहून गेले. तर इतरांना बाहेर येण्यास यश आले. सर्व जण धरणात वाहून गेल्याने सोबतच्या इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. त्यावेळी काही स्थानिक युवक व धरणावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे.

रेल्वे विभाग वन विभाग आणि नगरपरिषद अशा तिघांच्या अखत्यारीत येणारा हा परिसर असल्याने या तिन्ही विभागांमार्फत या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे आदी परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी अनोळखी ठिकाणी पाण्याची माहिती नसलेल्या भागात आणि डॅम मध्ये उतरणे टाळावे. पावसाचा अंदाज कमी जास्त होत असल्याकारणाने धबधबे आणि तलाव किती खोल आणि दूरवर पसरलेले आहेत याची माहिती नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा परिसरात जाणे टाळावे असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.

आयएनएस शिवाजी अन् शिवदुर्गकडून शोध मोहीम

अन्सारी कुटुंबातील व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर पोलिसांचे जीवरक्षक त्याचबरोबर आयएनएस शिवाजीचे जवान शिवदुर्ग तरुण मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली यामध्ये तिघांचे मृतदेह आढळले आहेत तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे रविवारी घडलेल्या या घटनेनंतर लोणावळा पोलिसांनी त्याचबरोबर नगरपरिषदेच्या सुरक्षारक्षकांची येथे अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे यापुढे पाण्यात उतरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest