संग्रहित छायाचित्र
अनैतिक संबंध ठेवल्यावर लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या प्रेयसीला जन्मठेपेची शिक्षा व एक लाख रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.
तुलसी पप्पू बाबर (वय ३२, रा. चिखली) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. पैगंबर गुलाब मुजावर (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या पत्नीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना १३ ऑगस्ट २०२१ रोजी चिंचवड येथील व्हाईट हाउस लॉजवर घडली होती.
पैगंबर आणि तुलसी हे चिंचवड परिसरातील एका कपडे विक्री दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते. विवाहित असलेल्या पैगंबरसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यावर तुलसीने लग्नासाठी तगादा लावला होता, तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यावरून पैगंबरचे पत्नीसोबत भांडणही झाले होते. घटनेच्या दिवशी तुलसीने पैगंबरला लॉजवर बोलावून घेतले. पैगंबर भेटायला येत नाही, तसेच लग्नासाठी नकार देत आहे, या कारणावरून दोघांमध्ये भांडणे झाली. त्यातूनच तुलसीने पैगंबरचा ओढणीने गळा आवळून खून केला, असे तक्रारीत नमूद आहे.
सहायक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये तक्रारदार महिलेसह लॉजवरील दोन कर्मचारी, आरोपी काम करत असलेल्या दुकानातील कर्मचारी, तपास अधिकारी, पंच आदी साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद आहे. पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग, कर्मचारी बी. टी. भोसले यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.