Pune Crime News
लक्ष्मण मोरे
घरकाम आणि साफसफाईच्या कामासाठी सौदी अरेबिया येथे नोकरी लावतो, म्हणून महिलांना पुश्सात फूस लावून सौदी अरेबिया येथे नेऊन त्यांची बड्या शेख लोकांना लाखो रुपयात विक्री करण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. राज्य महिला आयोगाने पोलिसांच्या मदतीने तीन महिलांची सुटका केली आहे. या रॅकेटचे 'केरळ कनेक्शन' समोर आले आहे.
पुण्यामधून नोकरीच्या बहाण्याने फूस लावून नेलेल्या महिलांची कागदपत्रे मुंबईमध्ये तयार केली जात असून त्यानंतर त्यांना केरळ मार्गे सौदी अरेबियामध्ये पाठविले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. भारतातील महिलांना अशा प्रकारे आखाती देशांमध्ये विकण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
याप्रकरणी एजंट असलेल्या नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमीमा खान आणि हकीम नावाच्या एजंट विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२२ ते २ जुलै २०२३ या कालावधी दरम्यान पुणे-मुंबई-केरळ आणि सौदी अरेबिया या ठिकाणी घडला.
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी (दि. १८) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या महिलांची कशाप्रकारे सुटका करण्यात आली, याची माहिती दिली. त्यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, उपायुक्त (सायबर) श्रीनिवास घाडगे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य अधिक स्पष्टपणाने समोर आले आहे.
पीडित महिला आणि तिची मुलगी या दोघींनाही सौदी अरेबिया येथे साफसफाईचे काम देतो म्हणून रियाध शहरातील एका मोठ्या शेखला चार लाख रुपयांमध्ये विकण्यात आले होते. त्यांच्या अज्ञानीपणाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन त्यांना टूरिस्ट विजा काढून सौदी अरेबिया येथे पाठविण्यात आले. पीडित महिला वस्तीमध्ये राहते. ती घरासमोर काम करीत बसलेली असताना आरोपी महिला तिच्यासमोरून फोनवर बोलत जात होती. तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात जाणीवपूर्वक ‘‘सौदी अरेबियामध्ये साफसफाईची कामगार पाहिजे आणि त्यांना हजारो रुपये पगार मिळतो,’’ असे ही महिला फोनवर बोलत होती. पीडित महिला गरजू असल्याने तिने पगार आणि कामाबाबत विचारणा केली. आरोपी महिलेने तिला सौदी अरेबियातील कामाची आणि पगाराची माहिती देऊन सौदी अरेबियात चलण्यासाठी तयार केले.
या महिलेसह तिच्या मुलीला पुण्यावरून मुंबईला नेण्यात आले. मुंबईमध्ये या महिलांची सर्व कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यांचे विमान तिकीट आणि व्हिसा मुंबईतच तयार करण्यात आला. त्यांची वैद्यकीय चाचणीदेखील मुंबईमध्ये झाली. त्या मुंबईमध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी राहिल्या, हे पीडित महिलांना माहित नाही. हे ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते आणि त्यांना त्या परिसराबद्दल किंवा परिसराच्या नावाबद्दल माहिती मिळू नये, याची पूर्ण खबरदारी आरोपींनी घेतली होती. त्यानंतर त्यांचे केरळसाठी रेल्वेचे रिझर्वेशन करण्यात आले. केरळमधून त्यांना विमानात बसवून सौदीला पाठवण्यात आले.
याच कालावधीमध्ये सदर महिलांचे फोटो व्हाॅट्सॲपवर सौदी अरेबियामध्ये पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांना घ्यायला सौदी अरेबियाच्या विमानतळावर काही जण आले. या महिलांना ज्या शेखला विकले होते, त्याच्या घरी काम करण्यासाठी पोचविण्यात आले. दोन वर्ष त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले. त्यांना ३५ ते ४० हजार रुपये दरमहा पगार द्यायचे ठरले होते. सुरुवातीला २०-२५ हजार रुपये त्यांना दिले जात होते. मात्र काही दिवसांनी पगार देणे बंद करण्यात आले. या संदर्भात शेखकडे विचारणा केली असता त्यांनी ‘‘मी तुम्हाला चार लाख रुपयात विकत घेतले आहे,’’ असे सांगितले. या दोन महिला एकाच शहरात होत्या. परंतु, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विकण्यात आलेले होते. दोघी आपसात फोनवर बोलत असताना त्यांना एकाच वेळी अझानचा आवाज आला आणि त्यांना लक्षात आलं की आपण अगदी जवळजवळच राहण्यास आहोत. मग, त्यांनी एकमेकींचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि एक दिवस कचरा टाकण्याच्या बहाण्याने त्या बाहेर पडल्या. त्या थेट तिथून भारतीय दूतावासामध्ये पोहोचल्या. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांना आपबीती सांगितली. ‘‘आम्हाला इथे विकले असून आमचे पासपोर्ट, कागदपत्रे काढून घेतली आहे,’’ असे सांगितले. याच कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या एका फेसबुक मैत्रिणीने महिला आयोगाचा ई-मेल पाठवला होता. या मुलींनी ७ जून रोजी महिला आयोगाला ई-मेल पाठवून सर्व हकीकत कळवली. त्यानंतर सर्व सूत्रे पटापट हलली. या मुलींचा दूतावासामध्येच नव्याने पासपोर्ट तयार करून त्यांना भारतामध्ये परत पाठविण्यात आले. अशाप्रकारे त्यांची सुटका झाली.
या सर्व तपासामध्ये पोलिसांना एक खूप मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये महिलांना चांगल्या कामाच्या आमिषाने जाळ्यात ओढून त्यांची आखाती देशांमध्ये शेख लोकांना विक्री करण्यासाठी एजंट नेमण्यात आलेले आहेत. हे एजंट महिलांना कामासाठी तयार केल्यानंतर त्यांना मुंबई-दिल्ली सारख्या शहरांमध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी त्यांची कागदपत्रे तयार केली जातात. त्यांचा व्हिसादेखील क्लिअर केला जातो. नंतर त्यांना सौदी अरेबियामध्ये पाठविले जाते. या तपासामध्ये केरळ कनेक्शन समोर आले आहे. केरळमध्येदेखील काही एजंट सक्रिय असून त्यांच्यामार्फतच विमानतळावरून या महिलांना सौदी अरेबियात पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्यांचादेखील शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेत केरळमधल्या एजंटचा नेमका रोल काय आहे, याची चाचपणी केली जात आहे. यापूर्वीदेखील खडक पोलीस ठाण्यामध्ये अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी तीन जणांना अटक करण्यात आली होती.