कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण: विशाल, शिवानी अगरवाल यांना जेलची हवा

कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेत पोर्शे कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अशपाक मकानदारला न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Kalyaninagar Accident

संग्रहित छायाचित्र

रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात पैसे पोहोचवणाऱ्या अशफाक मकानदारलाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेत पोर्शे कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल (Vishal Agarwal), शिवानी अगरवाल (Shivani Agarwal) आणि अशपाक मकानदारला न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. (Kalyaninagar Porsche Car Accident)

विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी शुक्रवारी (दि. १४) हा आदेश दिला. त्यामुळे अगरवाल दाम्पत्य आणि मकानदारचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे. अगरवाल दाम्पत्य आणि मकानदारच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी अगरवाल दाम्पत्य आणि अशपाक मकानदार यांच्यामध्ये एक महत्त्वाची मीटिंग झाली होती. ही मीटिंग नक्की कुठे झाली? तिथे कोण उपस्थित होते? तिथून ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला होता का, याबाबत तपास करण्यासाठी आरोपी अशपाक मकानदार याला तीन दिवसांची कोठडी द्यावी तर अगरवाल पती-पत्नीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.

अगरवाल दाम्पत्याच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील, अॅड. अबीद मुलाणी आणि मकानदारच्या वतीने अॅड. प्रसाद विजय कुलकर्णी यांनी बाजू मांडली. ‘‘आरोपींना पुरेशी पोलीस कोठडी झाली आहे. असे असताना तसेच अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली असताना एकट्या मकानदारची पोलीस कोठडीत कशी चौकशी करणार आहात,’’ असा युक्तिवाद अॅड. कुलकर्णी यांनी केला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अगरवाल दाम्पत्यासह मकानदारची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

मकानदार सर्वत्र हजर
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी तपासातील प्रगती अधोरेखित केली. आरोपी मकानदार हा रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरवडा पोलीस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याकरिता डॉक्टरांना देण्यासाठी मकानदार याने घेतलेल्या चार लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोरकडून जप्त करण्यात आले आहेत. परंतु उर्वरित एक लाख रुपये कोणाला दिले, याबाबत तो माहिती सांगत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest