कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण: ‘रक्ताचे नमुने आईचेच’; न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, आरोपींविरोधातील महत्त्वाचा पुरावा
कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील (Kalyani Nagar Accident Case) अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी दिलेले रक्ताचे नमुने हे त्याच्या आईचेच असल्याचा अहवाल प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे, असे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. आरोपींविरोधात हा पुरावा महत्त्वाचा ठरणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनंतर न्यायालयाने विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि शिवानी अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) या दाम्पत्याच्या पोलिस कोठडीत दहा जूनपर्यंत वाढ केली. ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची पोलिस कोठडी सात जूनपर्यंत वाढविली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला.
तत्पूर्वी, या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी तपासातील प्रगती अधोरेखित करताना रक्ताचे बदललेले नमुने आईचेच असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली. हा महत्त्वाचा पुरावा असून, त्या अनुषंगाने या प्रकरणात सर्व अटक आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. मोबाईलचा डाटा, कॉलच्या विश्लेषणातून आणि साक्षीदारांच्या चौकशीतून नवनवीन पुरावे समोर येत आहेत. त्यातून सर्व आरोपींचा सहभाग निष्पन्न करून गुन्ह्याची साखळी उलगडायची आहे, असे तपास अधिकारी तांबेंनी न्यायालयात सांगितले.
या प्रकरणात अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड या नवीन आरोपींना दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यापैकी अमोल गायकवाड हा मंगळवारी दिवसभर रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला बुधवारी ‘डिस्चार्ज’ मिळाला असून, त्याच्यासह सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केला. आरोपींच्यावतीने ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषिकेश गानू, ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. आरोपी अनेक दिवसांपासून पोलिस कोठडीत असून, प्रत्येक वेळी नवीन अटक झाल्यावर एकत्रित चौकशीच्या नावाखाली पोलिस कोठडीत वाढ मागितली जात आहे. आरोपींची घरझडती पूर्ण झाली असून, त्यांचे मोबाइलही जप्त केले आहेत. त्यामुळे वाढीव कोठडीसाठी पोलिसांकडून जुनीच कारणे दिली जात आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली, तरी ते तपासात सहकार्य करतील, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली.