संग्रहित छायाचित्र
भरधाव कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्याची सरबराई आणि मृतांच्या नातेवाईकांची फरफट, हेच नेहमीचे चित्र येरवडा पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री पाहावयास मिळाले. कार अपघातातील आरोपी असलेल्या बिल्डरच्या मुलाची सरबराई करताना त्याला ठाण्यात पिझ्झाही देण्यात आला. त्याचे नातेवाईक पोलीस ठाण्यात खुर्च्यांवर बसले होते. मात्र, परराज्यातून आलेल्या मृताच्या नातेवाईकांवर धावाधाव करण्याची वेळ आली होती. विशेष म्हणजे स्थानिक आमदारही बिल्डरसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला येरवडा पोलिसांनी रविवारी पहाटे ताब्यात घेतले. या अपघातात संगणक अभियंते असलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना जीव गमवावा लागला.‘ सीविक मिरर’ला या घटनेची माहिती देताना केशवनगर येथील रहिवासी असलेले मयत अनिशचे चुलत भाऊ पारस सोनी म्हणाले, मला झोपेत असतानाच फोन आला. घटनेची माहिती मिळाल्यावर मी तातडीने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अपघात केलेल्या मुलाला नागरिकांनी मारहाण केल्यावर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला तेथे एखाद्या व्हीआयपीप्रमाणे ट्रिटमेंट मिळत होती. पिझ्झाचे बॉक्स मागविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याला झोपण्याचीही परवानगी देण्यात आली होती. या भागातील स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात होते.
सोनी म्हणाले, आम्ही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी आणि संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत चौकशी करत होतो. तेव्हा पोलीस विनाकारण आमच्यावर रागावले. आमच्यावरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकीही दिली. आमच्या मित्रांनी जेव्हा सांगितले की ते या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, तेव्हा त्यांना ताब्यात घेण्याची धमकी दिली. तुम्ही मद्यपान केले आहे का, याची वैद्यकीय चाचणी करू का अशी विचारणा पोलिसांनी केली.
सुदैवाने गाडी चालवणाऱ्या चालकाला नागरिकांनी मारहाण केली होती आणि प्रत्यक्षदर्शींनीही त्याला गाडी चालवताना पाहिले होते. त्यामुळे पोलिसांना फार काही करता आले नाही. स्थानिक आमदारही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आम्हाला संशय होता. मात्र, मुलाला मारहाण झाल्याचा व्हीडीओ आमच्याकडे असल्याने तोच गुन्हेगार असल्यावर आम्ही ठाम राहिलो असे सोनी यांनी सांगितले.
पोलिसांची आमच्याबरोबर बोलण्याची भाषा योग्य नव्हती. उलट आम्हालाच ते त्रास देत होते. त्यामुळे आम्ही माध्यमाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी येण्याची विनंती केली. त्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी आम्ही रुग्णवाहिका शोधत होतो. आमच्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, आम्हाला कोणीही मदत केली नाही, अशी खंतही सोनी यांनी व्यक्त केली. आम्ही पोलीस ठाण्यात असताना आरोपीचे कुटुंब दोन मर्सिडिज कारमधून तेथे आले होते. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या देण्यात आल्या होत्या. त्यांची सरबराई केली जात होती. आम्ही मात्र पोलीस ठाण्याच्या बाहेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत बसलो होतो.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन आरोपीला स्कूटरवरून बाल न्याय मंडळासमोर नेण्यात येणार असल्याचे समजले. नंतर एका खासगी मोटारीतून त्याला घेऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ दोन मर्सिडिझ कार गेल्या, असे सोनी म्हणाले. नंतर एसीपी आरती बनसोडे यांनी खासगी एर्टिगा कारची व्यवस्था केली आणि नंतर त्याला घेऊन गेल्या. त्याच्या मागे दोन मर्सिडीज कारमधून एका महिला वकिलासह तीन वकिलांसह बाहेर पडल्या.
कल्याणीनगरमधील रहिवाशांच्या मागण्या
रात्री १० नंतर मोठ्या आवाजातील संगीताला बंदी. सर्व पब/रेस्ट्रोबारसाठी साउंडप्रूफिंग अनिवार्य असावे.
रात्री दीडनंतर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या पबवर कारवाई व्हावी, वारंवार गुन्हा करणाऱ्यांचे परवाने त्वरित रद्द करावे.
रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करा.
ग्राहक जास्त वेळ बाहेर रेंगाळणार नाहीत यासाठी पब, रेस्टॉरंटला जबाबदार धरा
सर्व पब/रेस्ट्रोबारचे स्वत:चे पार्किंग असावे
पब बंद होण्याची वेळ रात्री दीड ऐवजी रात्री ११ अशी करावी.
पब कल्चरवर कारवाईची मागणी
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार रात्री दीडनंतर बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. मात्र, हे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येथील नागरिक डॉ. हाजी झाकीर शेख म्हणाले, रविवारी पहाटेच्या सुमारास ही दुःखद घटना घडली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शहरातील काही पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. अपघातानंतरचे धक्कादायक फुटेज समोर आले आहे. त्यात तरुणी रस्त्यावर पडलेली आहे. रात्री उशिरापर्यंत मद्य देणाऱ्या पब आणि रेस्टॉरंट्सच्या अत्याधिक संख्येमुळे कल्याणीनगर हे आवाज आणि मद्यधुंदांचे ठिकाण बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सतत तक्रारी करत आहोत. दारूच्या नशेत भांडणे, गैरवर्तन आणि दारूच्या बाटल्या रस्त्यांवर टाकल्या जातात. यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात येते. दारू पिऊन बेफामपणे वाहन चालवताना अपघात होण्याचा धोका वाढतो. आम्ही पोलीस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला आहे. लोकप्रतिनिधींकडेही गाऱ्हाणे मांडले आहे. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही.
अशा प्रकारचे धोके टाळण्यासाठी, खरे तर रात्री अकरा वाजेपर्यंतच पब, बारला परवानगी द्यायला हवी. ही वेळ रात्री दीडपर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु आता रहिवाशांच्या सुरक्षेसाठी याचा पुनर्विचार केला पाहिजे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. ज्या भागात पब परवानगी संपल्यावरही पब चालू राहतात तेथे जास्त त्रास आहे.
"आरोपीचे वडील आणि माझे जुने व्यावसायिक संबंध आहेत. ते माझ्या मतदारसंघात राहतात. त्यांनी मला मदत मागितली म्हणून गेलो. पण कायदेशीर बाबीत कोणताही हस्तक्षेप केला नाही."
- सुनील टिंगरे, आमदार
"अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे बॉलरमध्ये येऊन गेले होते. मात्र, आम्ही बरोबर दोन वाजता सर्व ग्राहकांना बाहेर काढलेले होते. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना तपासासाठी दिले आहे."
- हेरंब शेळके, चालक, बॉलर पब
रविवारी मध्यरात्री अपघातात मृत पावलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना रविवारी सायंकाळी कल्याणीनगरच्या रहिवाशांनी मेणबत्ती पेटवून आदरांजली अर्पण केली.