संग्रहित छायाचित्र
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी वादग्रस्त कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग याच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणानंतर सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन निवृत्ती खुटवड (वय 43 वर्ष, पोलिस हवलदार) यांनी फिर्याद दाखल केली आहे. कालीचरण महाराजचा 11 मार्च रोजी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सनसिटी रोड जवळ हा कार्यक्रम पार पडला होता.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या सनसिटी रोड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हिंदू जनजागरण सभा कार्यक्रम घेण्यात आला होता. 11 मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात कालीचरण महाराजाने ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माविरोधात भडकाऊ भाषण केले होते. त्यानतंर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादग्रस्त विधान अन् कालीचरण
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल धर्म संसदेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ९५ दिवस गजाआड देखील रहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपली नाही.
देवी देवता हिंसक होते, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. अमरावती येथे शौर्य यात्रेत कालीचरण महाराजाने केले होते चिथावणीखोर विधान.
भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत. भारत पाकिस्तान युद्ध झाले तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील, असे आक्षेपार्ह मत मे २०२२ मध्ये त्यांनी अलिगढ येथे मांडले होते.
१५ डिसेंबरला अहमदनगर येथे लव जिहाद प्रकरणावर भाष्य केले होते. लव जिहादासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा डोकं ठिकाणावर येईल. असे तथ्यहिन व्यक्तव केले होते.
कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले. दरम्यान पुण्यात असेच भडखाऊ भाषण करते त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसून येत आहे.