Pune Yerwada jail : पहिल्याच दिवशी सराईत गुन्हेगारांकडे सापडले तीन मोबाईल
तुरुंगातील सराईत गुन्हेगारांकडे मोबाईल असल्याचे वृत्त ‘सीविक मिरर’ ने भाई, कॉलिंग फ्रॉम जेल या शिर्षकाखाली सोमवार, ४ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर येरवडा तुरुंगाच्या प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने आज येरवडा मध्यवर्ती तुरुंगाची झाडाझडती घेतली असता कैद्याकडे तीन मोबाईल सापडले. याप्रकरणी निरंजन उर्फ निलेश बाळू शिंदे, महेश राजू पांचारिया आणि अन्य एकावर मोबाईल बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून तुरुंग अधिकारी सुदर्शन खिलारे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी खिलारे येरवडा तुरुंगात जून २०२३ पासुन तुरूंगाधिकारी श्रेणी १ या पदावर काम करत आहेत. खिलारे यांना सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कैदी निरंजन ऊर्फ निलेश बाळु शिंदे याची झडती घेतली. यावेळी त्याच्या पिशवीमध्ये मोबाईल, बॅटरी आणि सिम कार्ड आढळून आले. तुरुंगात कैद्यांची आणि परिसराची तपासणी करताना एका ठिकाणी माती उकरलेली दिसली. त्यामुळे तेथील माती आणखी उकरली असता तेथेही एक काळ्या रंगाचा मोबाईल फोन, दोन बॅटऱ्या आणि चार्जर मिळाला.
अधिक तपासणीत कैदी महेश राजु पंचारिया हा मोबाईल वापरत असल्याचे समजले. तो झोपत असलेल्या व्हरांड्याची झडती घेतली असता फरशीच्या खाली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, बॅटरी व व्हीआय कंपनीचे सिमकार्ड दडवून ठेवलेले आढळले. कैदी परवानगी नसताना मोबाईल वापरत होते. कैद्यांकडे सापडलेले मोबाईल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. सोमवारच्या तुरुंगाच्या तपासणीत तीन मोबाईल आणि अन्य साहित्य सापडल्याने ‘सीविक मिरर’ने दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सराईत गुन्हेगार, भाई, डॉन राज्याच्या विविध तुरुंगात असले तरी त्यांचे व्हीडीओ तुरुंगातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच राज्याच्या अनेक तुरुंगात कैद्याकडे मोबाईल असल्याचे आढळले आहे. यामुळे तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था प्रसासनाच्या दाव्यानुसार खरोखरच अभैद्य आहे का असा प्रस्न निर्माण झाला आहे. कैदेतील गुन्हेगारांकडे मोबाईल येतात कसे, त्यांचे व्हीडीओ व्हायरल होतात कसे, हा लाखमोलाचा प्रश्न असून यातून तुरुगांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गुन्हेगारांचे व्हीडीओ त्यांच्या साथीदारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर येत असून त्यातून छुपा संदेश असलेले व्हीडीओ, फोटो समाजामध्ये प्रसारित होत आहेत. सध्या तुरुंग प्रशासनाने भेटायला येणाऱ्यांशी काचेच्या आडून इंटरकॉमवर बोलण्याची सुविधा गुन्हेगारांना उपलब्ध करून दिलेली आहे. याचाच गैरवापर होऊन व्हीडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातून दहशत माजविणे, छुप्या धमक्या देणे, निरोपाची देवाण-घेवाण होत असते. त्यातूनच गुन्हेगारांचे वर्क फ्रॉम जेल सुरू असते अशी चर्चा आहे.
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक अशा समाजमाध्यमावर कैद्यांचे फोटो प्रसारित होतात. कैद्यांचे तुरुंगातील वेगवेगळ्या कृतींचे फोटो विशिष्ट व्यक्तींकडून जाणीवपूर्वक व्हायरल होत आहेत. तुरुंगात कैद्यांना भेटायला येणाऱ्या कोणालाही अगदी वकिलालाही मोबाईल आत नेता येत नाही. यामुळे कैद्यांचे फोटो कोण आणि कसे काढतात ?, प्रशासनच फोटोग्राफर बोलावून कैद्यांचे फोटो संबंधितांना देतात का? असा सवाल वाजेद खान बीडकर या वकिलाने उपस्थित केला आहे. अशा व्हीडीओचे स्क्रीन शॉट त्यांनी दाखवले.
वाजेद खान बीडकर म्हणाले की, यापूर्वी अनेक वेळा तुरुंगामध्ये कैद्याजवळ मोबाईल सापडले आहेत. प्रशासनाच्या मदतीने मोबाईल उपलब्ध होतात, असे शिक्षा भोगून बाहेर आलेले कैदी सांगतात. कैद्याजवळ मोबाईल सापडल्यावर तपास केला जातो. काही प्रकरणात तुरुंग अधीक्षक निलंबनाची कारवाई करतात. मात्र त्यानंतरही पुन्हा कैद्याकडे मोबाईल आढळतात. काही प्रकरणात भेटायला येणाऱ्यांना मोबाइल बाळगण्याची परवानगी दिलेली दिसते.
काही दिवसांपूर्वी येरवडा तुरुंगात एका कैद्याकडे मोबाईल आढळला. तुरुंगात मोबाईल जॅमर यंत्रणा आहे. मात्र कैद्याकडे मोबाईल सापडल्याने जॅमर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याप्रकरणाचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा आज येरवडा तुरुंगात तीन मोबाईल सापडणे ही धक्कादायक बाब आहे.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे म्हणाले की, तीन कैद्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.