संग्रहित छायाचित्र
प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीच्या एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराचा खून केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपीसह पाच जणांना न्यायालयाने दीड लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मृत मुलाच्या वडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. खून झालेल्या तरुणाचे वडील पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते.
प्रवीण दत्तात्रय चौगुले, यशवंत रामचंद्र खामकर, अनिल बहिरू अजगेकर, गोट्या उर्फ देवेंद्र अशोक माने आणि रमेश रंगल्या देवदुर्ग अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रतीक प्रमोद जगताप असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील पुण्यात राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत होते.
२०११ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन तपासात महत्त्वाचे ठरले. एका तरुणीचे प्रतीकवर प्रेम होते. मात्र, तरुणीच्या घरी कळल्यावर त्यांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. आई-वडील जबरदस्ती दुसऱ्या मुलाशी लग्न लावतील, या विचाराने तरुणी घरातून पळून गेली. त्यानंतर ती एका 'बीपीओ' मध्ये पार्ट टाइम नोकरी करू लागली. तिथे तिची प्रवीण चौगुलेशी ओळख झाली. या काळात प्रवीणचेही तिच्यावर प्रेम जडले. त्यानंतर तरुणी प्रवीणसोबत राहू लागली. तरुणी प्रवीणच्या गावी, इचलकरंजी येथेही जाऊन आली. प्रवीणने तिला लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा तिने तिचे प्रतीकशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रवीणने प्रतीकचा काटा काढण्याचा निर्णय घेऊन त्याचा खून केला.
प्रतीकला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी प्रवीण इचलकरंजीवरून पुण्यात आला. त्याने प्रतीकला लोहगाव विमानतळ येथील पार्किंग गेटला भेटण्यासाठी बोलावले. तेथे आरोपींनी प्रतीकला जबरदस्तीने कारमध्ये बसवून शिक्रापूरला नेले. तेथे त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पेट्रोल ओतून जाळले. त्यानंतर प्रतीकच्या कुटुंबीयांना काही संशय येऊ नये, म्हणून आरोपींनी प्रतीकच्या मोबाइलवरून त्याच्या आई आणि भावाला काही मेसेज पाठविले होते.
सरकारी वकील राजेश कावेडिया म्हणाले, ‘‘प्रतीक जगतापच्या खूनप्रकरणात सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि टीडीआर (टोल डिटेल रेकॉर्ड) हे महत्त्वपूर्ण पुरावे ठरले. प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन न्यायालयानेही निकालात प्रेमाचा त्रिकोण या शब्दाचा आवर्जून उल्लेख केला आहे’’