संग्रहित छायाचित्र
कल्याणीनगर येथील 'व्हीनस वाईन्स' या मद्यविक्री दुकानाची अनुज्ञप्ती (लायसन्स) बनावट व्यक्ती उभा करून भलत्याच नावाच्या व्यक्तीला लाखो रुपयांना विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार १५ जून २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयामध्ये घडला. विशेष म्हणजे या सर्व गैरव्यवहारामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी सहभागी असल्याचे देखील समोर आले आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.
ॲॅड. पंकज अरविंद वाडीकर (रा. नारायण पेठ), दिलीप ज्ञानानी (रा. घाटकोपर, मुंबई), पंकज खुल्लर (रा. वरळी, मुंबई), व्यंकटेश कोटलवार आणि रमेश बापूरावजी पदमवार नावाचा तोतया व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी उपअधीक्षक संतोष बब्रुवान जगदाळे (वय ५०, रा. कैलास हाऊसिंग सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी सचिन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील 'व्हीनस वाईन्स' या मद्यविक्री दुकानाचा परवाना चंद्रपूर येथे राहणारे रमेश बाबुरावजी पदमवार यांच्या नावाने आहे. साधारणपणे ३५ वर्षांपूर्वीचा हा परवाना असल्याचे पोलिसांनी सांगितले. पदमवार यांचे हे दुकान त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना चालविण्यासाठी कराराने दिलेले होते. त्याच व्यक्तींनी रमेश पदमवार यांच्या नावाने बनावट व्यक्ती उभा करून हा परवाना वासुमल लालचंद मनकानी आणि प्रदीप लालचंद मनकानी यांच्या नावाने वर्ग केला.
या संदर्भात काही दिवसांनी रमेश पदमवार यांचा मुलगा अभिजीत पदमवार यांना माहिती मिळाली. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी तक्रारीचा तपास करायला सुरुवात केली. या चौकशीमध्ये मूळ मालक रमेश पदमवार हे हयात असताना देखील त्यांच्या नावाने बनावट व्यक्ती उभा करून परवाना दुसऱ्याच्या नावाने वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी ४१७, ४१९, ४६५, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.