रक्षाबंधनच्या दिवशीच भावाच्या डोळ्यादेखत बहिणीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात भावाच्या डोळ्यादेखत बहिणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी झालेल्या या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीवरून हे बहिण-भाऊ जात असताना भरधाव कारने धडक दिली त्यामध्ये बहिणीचा मृ्त्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्याजवळ बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सर्वत्र रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना पुणे जिल्ह्यातून ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.
वैशाली नितीन शेंडगे (वय- २८, रा. नायगाव, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे. जखमी विलास यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलिसांनी धाव घेतली असून कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनच्या निमित्ताने वैशाली व भाऊ विलास हे दोघे बहिण-भाऊ दुचाकीवरून बोरीभडक येथे निघाले होते. दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. या धडकेत वैशाली यांच्या डोक्याला जबर मार लागला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली व जखमी वैशाली व विलास यांना उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान वैशाली यांचा मृत्यू झाला.