पुण्यात जादूटोणा करत व्यावसायिकाला ९० लाखाला घातला गंडा
जादूटोणा करत व्यवसायात गुंतवणूक करायला सांगून एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यावसायिक शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ ( वय ४५ रा. अशोका म्यूज सोसायटी कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नादीर अब्दुल हुसेन हसन अली नईम आबादी आणि पाच साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ यांचा पादत्राणांचा होलसेल, रिटेल व्यवसाय आहे. त्यांची नादीर अब्दुल हुसेन हसन अली नईम आबादी व त्याची पत्नी सीमा नादीर अब्दुल हुसेन (रा. कॅम्प ) यांच्याशी ओळख झाली. ते इम्पोर्ट एक्सपोर्टचा मोठा व्यवसाय करत असल्याचे फिर्यादीस समजले. त्यानंतर एकमेकांचे येणे जाणे सुरु झाले. त्यामुळे कौटुंबिक, मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाले. फेब्रुवारी २०२० मध्ये फिर्यादी त्यांच्या दुकानात असताना नादीर आणि पत्नी सिमा फिर्यादीच्या दुकानात गेले. यांनी फिर्यादीला त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यात पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, आम्ही डॉलर मध्ये कमवतो असे सांगितले.
त्यावेळी फिर्यादी यांनी १९ लाखांची गुंतवणूक केली. मौलाना शोएब आणि नादीर हे मित्र आहेत. ते २०२० च्याअखेरीस फिर्यादीकडे गेले आणि त्यांनी फिर्यादीला ३८ लाख रुपये दिले. ही रकम गुंतवणुक व त्यावरील परतावा अशी होती. फिर्यादीने रोख पैसे घेणार नाही, ती रक्कम माझ्या खात्यावर भरावी असे सांगितले. त्यावर मौलाना शोएब आणि नादीर त्यांनी सांगितले की, ही रक्कम पुन्हा गुंतविल्यास अजून चांगला परतावा मिळेल. गल्फ कंट्री मध्ये कांदा निर्यात केल्यास चांगला परतावा मिळेल, असे ही सांगितले.
२०२० मध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर चार महिन्यातच चांगला परतावा मिळाल्यामुळे फिर्यादींचा त्यांच्यावर विश्वास बसला. मौलाना शोएब यांनी फिर्यादीस जानेवारी २०२१ पासूनच पैसे गुंतवण्याची तयारी करा असे सांगून रमजानच्या काळात पैसे गुंतविल्यास दुप्पट तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखविले. त्यामुळे फिर्यादींनी १८ लाखांची गुंतवणूक केली.
त्यानंतर २८ जुलै २०२२ रोजी मौलाना शोएब याच्या घरी फिर्यादी गेले. त्यांनी मौलाना शोएब यास गुंतवणुक रक्कम व त्यावरील परतावा मागितला. तेव्हा मौलाना शोएब म्हणाले मी आताच हज यात्रेवरुन आलो आहे. मला मक्का येथे व्यावसायिकाबरोबर भागीदारी मिळाली आहे. सऊदी मक्का येथे क्लॉक टॉवर पी-३ मध्ये जागा व लायसन्स मिळाले असे सांगून काही कागदपत्र फिर्यादीस दाखवली. तुम्ही आमच्याकडे अजून २५ लाख रुपयांची गुंतवणुक करा. असे म्हणाले तेव्हा फिर्यादी म्हणाले तुम्हाला एवढे पैसे दिले परंतू आता पर्यंत मला काहीच रक्कम मिळालेली नाही. तेव्हा मौलाना शोएब म्हणाला की, तुझे टेन्शन मी दुर करतो. मी मौलाना आहे. माझ्याकडे मोक्कील (जिन्नात ) आहे, विश्वास ठेवा. असे म्हणून एक मंत्र म्हणून खिशामधून राख काढून त्याने फिर्यादीच्या डोक्यावर ठेवून फुंक मारली. सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी फिर्यादीस पिण्यास दिले. त्यांनी ताबीज बनविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली.
वेळोवेळी दोघां आरोपीने वेगवेगळ्या बहाण्याने फिर्यादीचे ९० लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.