छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्या
लक्ष्मण मोरे
शहरातील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे महिलांना छेडछाडीचा सामना करावा लागत आहे. याच छेडछाडीला कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लोहगाव येथील मोझे आळी येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे लोहगाव परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिशला बंडू कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (वय २२, रा. मोझे आळी, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशला ही घरापासून जवळच असलेल्या शाळेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होती, तर आरोपी सोमनाथ हा ऑटोरिक्षा चालक आहे. त्याचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. त्याचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्रिशलाला वडील नाहीत. त्यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. हे कुटुंब मूळचे पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी आहे. परंतु, काही वर्षांपूर्वी त्यांनी लोहगाव येथील मोझे आळी या ठिकाणी घर घेतले होते आणि याच ठिकाणी ते राहात होते.
त्रिशलाची आई ही विमाननगर येथील एका दुकानामध्ये नोकरी करून आपला चरितार्थ चालवते. आरोपी सोमनाथ हा त्यांच्याच गल्लीमध्ये राहण्यास आहे. ८ दिवसांपूर्वी त्रिशला ही क्लासला जात असताना आरोपीने तिला अडवले. तिच्याजवळ ऑटो रिक्षा थांबून 'ऑटो रिक्षात बस, मी तुला सोडतो' असे म्हणत त्याने छेड काढली होती. त्यावेळी ती मुलगी कशीबशी तिथून निघून आली होती.
११ सप्टेंबर रोजी सोमनाथने पुन्हा तिचा पाठलाग केला. कोणताही विचार न करता तो तिच्या घरामध्ये घुसला आणि घरातील सोफ्यावर तो थेट तिच्याजवळच जाऊन बसला. तिच्या अंगाला हात लावून त्याने लगट करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी या मुलीने बाजूला सरकत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्रिशलाची आई घरामध्ये आली. तिने सोमनाथला घरात आल्याचे पाहिले. काही कळायच्या आतच तो ताडकन उठला आणि त्यांना धक्का देऊन पळून गेला. तिची आई त्याला पकडण्यासाठी मागे धावत गेली. सोमनाथकडून होणारी छेडछाड, रस्त्यावर अडवून बोलणे, धमकावणे यामुळे तिच्या मनात दहशत निर्माण झाली होती. त्याला घाबरलेल्या त्रिशलाने घरामध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी सोमनाथच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आत्महत्या केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मुलीच्या कुटुंबीयांकडून पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार यापूर्वी करण्यात आलेली नव्हती. न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याकरिता पालकांनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करता येईल. पालकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार द्यावी.
- विलास सोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे