संग्रहित छायाचित्र
पुणे : इलेक्ट्रिक व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्क्याचा नफा सहा महिन्यात देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराला दीड कोटी रुपयांचे कर्ज काढायला लावत आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २४ मार्च २०१७ पासून आजवर औंध येथील डिफेन्स ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच सातारा शहरात घडला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीप्रकरणी चार जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी जनार्दन धुमाळ, संगीता शिवाजी धुमाळ (दोघेही रा. सातारा) तेजस दत्तात्रय भोसले, दत्तात्रय गुलाबराव भोसले (दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सिद्धनाथ पंढरीनाथ बोबडे (वय ५६, रा. दौलतनगर, करंजे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी धुमाळ आणि सिद्धनाथ बोबडे यांची जुनी ओळख आहे. धुमाळ याची 'धुमाळ इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, अकोला' नावाची कंपनी आहे. या कंपनीला पाच कोटी २७ लाख रुपयांचे मोठे कंत्राट मिळाल्याचे बतावणी त्याने बोबडे यांना केली.
या व्यवसायात गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के चांगला नफा सहा महिन्यात देण्याचे त्यांना कबूल केले. त्यांचा विश्वास संपादन करून व्यवसायात येण्याचे आमिष दाखवले. बोबडे हे व्यवसायाकरिता आवश्यक असलेली रक्कम उभी करण्यासाठी सातारा जिल्हा नागरी पतसंस्थेमध्ये गेले. दत्तात्रय भोसले हा त्या पतसंस्थेचा चेअरमन होता. कर्ज मंजुरीसाठी गेल्यानंतर त्याने त्याचा मुलगा तेजस याला भागीदार म्हणून घ्यावे लागेल अशी अट घातली. त्यानुसार फिर्यादी धुमाळ आणि भोसले यांच्यामध्ये भागीदारी करारनामा झाला. बोबडे यांनी एक कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.
ही रक्कम धुमाळ याला मिळालेल्या कंत्राटाच्या कामामध्ये लावण्यात आली. त्यानंतर त्या कंत्राटाचे काम सुरू झाले. याच कालावधी दरम्यान त्यांना कामाचा हिशोब सांगितला नाही. तसेच, बोबडे यांची बँक ऑफ बडोदा येथील सायनिंग अथॉरिटी बदलण्यात आली. कराराप्रमाणे बोबडे यांच्या हिश्याची रक्कम त्यांना न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली. तेजस भोसले यांनी बोबडे यांची पत्नी आणि मेहुणे यांच्या नावे कर्ज काढण्यास सांगितले. त्यानुसार बोबडे यांनी आणखी कर्ज काढले. या कर्जाची रक्कम भरतो असा विश्वास दिला. कर्जाची ही रक्कम स्वतःच्या भागीदारी करता वापरून त्याची परतफेड न करता फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर करीत आहेत.