संग्रहित छायाचित्र
पुणे : चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, घराजवळ शाळा असावी, पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे अशी आपेक्षा सर्वसाधारण प्रत्येक पालकाची असते. गरीबांच्या मुलांना शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीइ-राइट टू एज्युकेशन) इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. या कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धडपड असते. त्यासाठी पालक पैसे मोजायलाही तयार असतात. मात्र यातून तब्बल ५३ पालकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील लेखापालाने आरटीई कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष पालकांना दाखविले. लेखापालाच्या या आमिषाला बळी पडून प्रवेशासाठी पैसे दिले होते. मात्र यात तब्बल ५३ पालकांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयकुमार रुपचंद भांडारकर (सध्या रा. मांजरी, मूळ रा. भंडारा) असे गुन्हा दाखल केलेल्या लेखापालाचे नाव आहे. याबाबत शाळेचे सहायक व्यवस्थापक स्वानंद चंद्रकांत कुलकर्णी (वय ४७, रा.वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोलीतील उबाळे नगर परिसरात पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे .आरोपी विनयकुमार शाळेत लेखापाल म्हणून कार्यरत आहे. शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश मिळावा याकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी दरवर्षी प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते. घराजवळील शाळेचा विचार करुन ‘आरटीई’अंतर्गत अर्ज दाखल करतात. मात्र काही वेळी घराजवळ शाळा मिळत नाही. त्यामुळे मुलांना घराच्या जवळ किंवा परिसरातील चांगल्या शाळे मिळावा यासाठी प्रयत्न करतात. शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालक शिफारस, तसेच प्रयत्न करतात. काही वेळा मध्यस्तांच्या मार्फेत पैसे देवून हव्या शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र यात प्रवेश ऐवजी फसवणूकीचेच प्रकार अधिक घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भांडारकर याने पालकांना ‘आरटीई’ कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने ५३ पालकांकडून रोख, तसेच ऑनलाइन पद्धतीने १३ लाख ६५ हजार रुपये घेतले होते. पालकांनी एप्रिल महिन्यात पैसे दिले होते. त्यानंतर प्रवेश न मिळाल्याने पालकांनी भांडारकर याच्याकडे विचारणा केली. पालकांनी याबाबत शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार दिली. त्यानंतर शाळेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. भांडारकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पालीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.