पिंपळे गुरवमध्ये दोघांकडून १४ वाहनांची तोडफोड; पत्ता न सांगितल्याने गतिमंद तरुणावर कोयत्याने वार

दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी पिंपळे गुरव व नवी सांगवीतील कवडेनगर येथे १४ वाहनांची तोडफोड केली. एवढेच नाही तर पत्ता सांगितला नाही म्हणून गतिमंद तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. १५) पहाटे चारच्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 02:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी पिंपळे गुरव व नवी सांगवीतील कवडेनगर येथे  १४ वाहनांची तोडफोड केली. एवढेच नाही तर पत्ता सांगितला नाही म्हणून गतिमंद तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. १५) पहाटे चारच्या सुमारास घडली.

सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजेश किसन झांबरे (वय २३) असे गंभीर जखमी झालेल्या गतिमंद तरुणाचे नाव आहे. शशिकांत दादाराव बनसोडे (वय २४, रा. रहाटणी) आणि प्रथमेश अरुण इंगळे (वय १८, रा. रामनगर, रहाटणी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी किसन इंदरराव झांबरे (वय ५५, रा. कवडेनगर, नवी सांगवी) व ऋषीकेश अशोक ससाणे (वय २४, रा. मयूरीनगरी जवळ, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात वेगवेगळी फिर्याद दिली आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी याबाबत माहिती दिली. नवी सांगवी येथील मयूरीनगरी हौसिंग सोसायटीजवळ दोन दिवसांपूर्वी लाला पाटील आणि त्याच्या साथीदारांनी दोन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती.

या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी बनसोडे व इंगळे हे पहाटे चारच्या सुमारास लाला पाटील याचा शोध घेत होते. यावेळी राजेश हा घराबाहेर उभा असताना आरोपींनी त्याला लाला पाटील याचा पत्ता विचारला. मात्र, त्याने पत्ता न सांगितल्याने तसेच त्याने कारच्या काचा फोडताना पाहिल्याने आरोपींनी राजेशवर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर आरोपी बनसोडे व इंगळे यांनी आपला मोर्चा मयूरीनगरीकडे वळवला. जाताना रस्त्यात दिसतील त्या वाहनांवर कोयत्याने मारून काचा फोडल्या. यावेळी फिर्यादी ससाणे हे त्यांच्या मालकाच्या कारमध्ये बसलेले असताना आरोपींनी त्यांच्या कारवरही कोयत्याने मारत काचा फोडल्या.

ससाणे कारमध्ये बसलेले पाहून चालकाच्या आसनाकडील दरवाजाच्या काचेवरही कोयत्याने हल्ला केला. तसेच, कोयते हवेत फिरवत दहशत माजवत आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोडीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest