भाजपच्या माजी नगरसेवकाने केली कोट्यवधींची फसवणूक
नितीन गांगर्डे
भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांनी साडे पाच कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
श्रीराम गॅस एजन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास बँकेपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून उदय त्र्यंबक जोशी (वय ६५), मयूरेश उदय जोशी (वय ४६, दोघेही रा. पानमळा) यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांपैकी ९ जणांनी पुढे येत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांची एकूण ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी जोशी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मंगेश जगदीश खरे (वय ४६, रा. लक्ष्मीप्रसाद सोसायटी, सदाशिव पेठ) यांच्यासह ९ जणांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. त्यानंतरच्या काळात त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या नगरसेविका होत्या. त्यांचा मुलगा मयूरेश जोशी श्रीराम गॅस एजन्सी चालवतो. याच एजन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास बँकेपेक्षाही अधिक परतावा देण्याचे आमिष ते दाखवत होते. त्यांच्या या भूलथापांवर विश्वास ठेवून फिर्यादी मंगेश खरे यांनी ९ लाख १० हजार रुपये आणि त्यांच्या आईच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये असे एकूण १४ लाख १० हजार रुपये एवढी रक्कम श्रीराम गॅस एजन्सीमध्ये गुंतवली होती.
मयूरेश जोशी याने रिझर्व बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोट्या एफ डी सर्टिफिकेट्स फिर्यादीला दिल्या. त्यावर कोणताही परतावा दिला नाही. फिर्यादीने त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता ‘‘तुला तुझ्या जिवाची भीती वगैरे वाटत नाही काय,’’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याप्रमाणे उदय जोशी याने अनेकांची फसवणूक केली आहे.
फिर्यादी मंगेश खरे यांच्या घरासमोरच उदय जोशी सद्भाव सदनिका अर्पाटमेंट येथे राहात असल्याने फिर्यादी त्यांना लहानपणापासून ओळखतात. त्यांनी फिर्यादींना जुलै २०२१ मध्ये त्यांचा मुलगा मयूरेश उदय जोशी यांच्या श्रीराम गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविण्यास सांगितले होते. फिर्यादींनी त्यांच्या भारत गॅस, डिस्ट्रीब्यूटर्स श्रीराम गॅस एजन्सीमध्ये (शॉप नंबर १२, सुवर्णनगरी सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) २७ जुलै २०२१ रोजी ५ लाख ६० हजार, ८ नोव्हेंबर २०२१ ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये ३ लाख ५० हजार रुपये गुंतवले. हे पैसे त्यांनी मयूरेश जोशी याच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले. तसेच त्यांची आई जयश्री जगदीश खरे यांच्या नावावरून १३ डिसेंबर रोजी ५ लाख रुपये गुंतवले होते. फिर्यादीने मयूरेश जोशी याच्याकडे एकूण १४ लाख १० हजार रुपये गुंतवले.
मयूरेश जोशी याने फिर्यादीस सांगितले होते की, ६ महिन्यांमध्ये बँकेच्या व्याजापेक्षा अधिक व्याज परतावा आम्ही देऊ. मयूरेश जोशी याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिलेली नसतानासुद्धा त्याने फिर्यादीस वार्षिक १२ टक्के व्याजाचे खोटे एफ डी सर्टिफिकेट्स दिले आहेत.
उदय जोशी आणि त्यांच्या मुलाने जवळपास १०० जणांना २५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. हा प्रकार जुलै २०२१ ते ६ डिसेबर २०२२ दरम्यान घडला आहे.