संग्रहित छायाचित्र
पुणे : 'स्टारयुरेका इन्शुरन्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत इन्शुरन्स पॉलिसी काढून त्यावर शून्य टक्क्याने कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदाराची ६८ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार २०२१ पासून अद्याप पर्यंत सुरू होता. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये भादवि ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश तुकाराम घुलघुले (रा. मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमित प्रकाश जोशी (वय ४९, रा. मालती माधव अपार्टमेंट, कोहिनूर कॉलनी, सहकार नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश घुलघुले यांनी स्टारयुरेका इन्शुरन्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून जोशी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईलनंबर वरून फोन करून इन्शुरन्स पॉलिसी काढल्यावर त्यावर पाच कोटी रुपयांचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देतो असे सांगितले होते.
जोशी यांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या एक कोटी ६४ लाख रुपयांच्या पॉलिसी काढण्यास भाग पाडले. त्यानंतर जोशी यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज त्यांनी दिले नाही. स्टारयुरेका इन्शुरन्स कंपनीचे संचालक असलेल्या आरोपी घुलघुले याने या पॉलिसी रद्द केल्या. त्याचे सर्व प्रीमियम परत देण्याचे आश्वासन देखील दिले. परंतु, पूर्ण रक्कम अद्याप पर्यंत जोशी यांना देण्यात आलेली नाही. त्यांचे पैसे परत करण्यात आलेले नाहीत.
यासोबतच कोणत्याही प्रकारचे कर्ज देखील मंजूर करण्यात आलेले नाही. अशा प्रकारे त्यांची एकूण ६८ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.