हॉटेलवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पुणे : लोणीकंद येथील हॉटेल मनोरा लॉजिंग अँड बोर्डिंग अँड रेस्टॉरंट या ठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या ठिकाणी छापेमारी करीत सहा तरुणी आणि महिलांची सुटका केली आहे. यामध्ये एका बांग्लादेशी तरुणीचाही समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे लोणीकंद परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी प्रज्योत हिरीअण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा, लोणीकंद) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथील हॉटेल मनोरामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकत कारवाई करण्यात आली.
सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये तीन महिला या पश्चिम बंगालच्या आहेत. तर, २१ वर्षीय तरुणी मूळची बांगलादेशची असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींनी या महिलांना अधिकच्या पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाया करिता प्रवृत्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.