माजी मंत्र्यांच्या मुलाने केला महिलेचा विनयभंग
पुणे : माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (Former minister Balasaheb Shivarkar) यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर (Former corporator Abhijit ShivarkarI यांच्यासह चौदा जणांविरुद्ध वणावडी पोलीस ठाण्यात जागेचा जबरदस्ती ताबा घेण्याचा आणि विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान वानवडी गावात घडला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी व मुलगा, राजेश खैरालिया (रा. वानवडी गाव), किरण छेत्री (रा. वानवडी गांव) यांच्यासह आणखी दहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आणि त्यांच्या भावकीची मौजे वानवडी येथील सर्वे क्रमांक ७९०/५३ येथे आठ गुंठे जागा आहे. ही त्यांची वडीलोपार्जीत मिळकत आहे. फिर्यादी महिला या जागेची कायदेशीर वारस आहे. त्यांनी या जागेची भूमापन अधिकारी कार्यालय क्रमांक दोन यांच्यामार्फत सरकारी मोजणी करून घेतलेली आहे. त्याचा मोजणी क्रमांक ६३०५ असा आहे.
याठिकाणी काही महिला आणि पुरुष कामगारांकडून त्यांनी कंपाऊंड लावून घेण्यास सुरुवात केली होती. हे काम सध्या सुरू होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अभिजीत शिवरकर, भास्कर गायकवाड, राजेश खैरालिया, किरण छेत्री त्यांच्या दहा ते बारा साथीदारांसह तेथे आले. त्यांनी कामगारांना काम करण्यापासून परावृत्त करून लोखंडी पिलर काढून टाकले. त्यावेळी ही महिला तेथे गेली असता तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आम्ही या जागेचे मालक आहोत अशी दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या महिलेच्या साडीचा पदर हाताने ओढून त्यांना फरफटत नेले. त्यांना जागेच्या बाहेर काढून शिवीगाळ व दमदाटी करून 'पुन्हा या जागेमध्ये दिसाल तर तुमच्यासहीत तुमच्या भावकीचे इथेच मुडदे पाडू' अशी धमकी दिली. यासंदर्भात महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनावणे करीत आहेत.