संग्रहित छायाचित्र
पुणे : सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी वसंत कोरेगावकर यांची दीड कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फुटवेअर कंपनीबाबत कुलमुखत्यारपत्र तयार करून दिल्यानंतर करारनाम्याचा भंग करून ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २०१७ ते आज पर्यंत शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीमध्ये घडला.
याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात राजेश वसंतराव कारंडे (वय ५७), लीना राजेश कारंडे, निलेश वसंतराव कारंडे, अपर्णा निलेश कारंडे, लता वसंतराव कारंडे (सर्व रा. मॉडेल कॉलनी) यांच्याविरोधात भादवि कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वसंत यल्लाप्पा कोरेगावकर (वय ७५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगावकर हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी जिल्हा अधीक्षक, उपमहा निरीक्षक पदावर काम केलेले आहे. त्यांनी आरोपींच्या कास फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक कोटी ५५ लाख रुपये गुंतवले होते. या गुंतवणुकीपोटी आरोपींनी कोरेगावकर यांना शेअर सर्टिफिकेट दिले. तसेच, करारनामा करून कुलमुखत्यार पत्र अर्थात पॉवर ऑफ अटर्नी करून देण्यात आली. परंतु, काही काळाने या कराराचा भंग करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.