Pune News: तब्बल ११ वर्षांनंतर डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता.१० ) न्यायालयाने दिला असून दोघांना दोषी ठरवले असून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हत्येनंतर तब्बल १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागले.

Ravindra Dhangekar

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता.१० ) न्यायालयाने दिला असून दोघांना दोषी ठरवले असून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.   हत्येनंतर तब्बल १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागले. या प्रकरणात पुणे  न्यायालायाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, वीरेंद्रसिंह तावडे,  विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या हत्या प्रकरणांचा तपास केला.

या गुन्ह्यातील आरोपी  सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे,संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.

या कलमांनुसार आरोपी निश्चिती: 

तावडे, अंदूरे, कळसकर आणि भावे यांच्यावर  भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी  जामिनावर बाहेर होते.

कर्नाटक पोलिसांनी उलगडला हत्येचा कट: 

बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुनाप्रकारणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते.  त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागेदोरे मिळाले होते. त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे  पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली होती. त्याने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest