सायबर चोरांनी वर्षभरात लुटले ४३० कोटी

सायबर चोरट्यांनी मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना एक दोन नव्हे तर तब्बल ४३० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सायबर ठग ही देशासह राज्यातील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असून, सहज मोठा परतावा मिळविण्याच्या नादात नागरिक कोट्यवधीचे पैसे घालवून बसले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 3 Jan 2025
  • 04:40 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमधून २० हजार ६८८ जणांनी केल्या तक्रारी, नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर हिंजवडी आयटी हब परिसरातून सर्वाधिक तक्रारी

सायबर चोरट्यांनी मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना एक दोन नव्हे तर तब्बल ४३० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सायबर ठग ही देशासह राज्यातील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असून, सहज मोठा परतावा मिळविण्याच्या नादात नागरिक कोट्यवधीचे पैसे घालवून बसले आहेत. 

मागील वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्रातील ५ हजार कोटी इतक्या मोठ्या रकमेवर स्कॅमर्सने डल्ला मारल्याची नोंद आहे. दरम्यान, मागील अकरा महिन्यात पिंपरी- चिंचवड शहरातील २० हजार ६८८ जणांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रारी केल्या असून या सर्व घटनांमध्ये तब्बल ४३० कोटी रुपये सायबर चोरट्यांनी लांबवले आहेत. स्कॅमर्सच्या भूलथापांना बळी पडलेल्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच ३ हजार ५६६ जण आयटी नगरीतील आहेत. त्यामुळे उच्चशिक्षितही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे अधोरेखित होत आहे.

हिंजवडी आयटी परिसरात आयटीयन्सची संख्या मोठी आहे. इतरांच्या तुलनेत आयटीयन्सना ऑनलाईन तंत्रज्ञान कसे काम करते हे माहिती आहे. मात्र, तरीदेखील हिंजवडी पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटीयन्सची संख्या मोठी आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या पाहून पोलीसही अवाक होत आहेत.

हिंजवडी आयटी हबमध्ये काम करणाऱ्या आयटी क्षेत्रातील नोकरदारांनी राहण्यासाठी हिंजवडी सोबतच वाकड परिसराला देखील मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे हिंजवडी पाठोपाठ ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाकड परिसरातून जास्त आहेत. मागील अकरा महिन्यात वाकड पोलीस ठाण्यात ३ हजार २१५ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाकड पोलीस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. मागील काही वर्षांपासून 'स्ट्रीट' क्राईमच्या तुलनेत सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर अंकुश ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.   

सामान्य आणि वारंवार नोंदवल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये सायबर स्टॉकिंग, पोर्नोग्राफी, मॉर्फिंग, ऑनलाइन छळ, बदनामीकारक किंवा त्रासदायक संदेश, ट्रोलिंग किंवा गुंडगिरी, ब्लॅकमेलिंग, धमकी देणे, ईमेल फसवणूक, तोतयागिरी आदींचा समावेश आहे. फसवणूक टाळायची असल्यास सायबर साक्षर होणे गरजेचे असल्याचे मत पोलिसांचे आहे. 

७ हजार ७९३ अर्जांची निर्गती

मागील अकरा महिन्यात शहरातील २० हजार ६८८ जणांची फसवणूक झाली असून तब्बल ४३० कोटी रुपये लांबवल्याची नोंद आहे. यातील ७ हजार ७९३ अर्जांचा निपटारा  करण्यात आला आहे. यातील काहीजणांचे पैसे माघारी मिळवून देण्यात तर काही जणांचे पैसे होल्ड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे लक्षात घेता स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस खात्यातील आयटी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच उच्चशिक्षितही बळी पडत आहेत.   - विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

मागील अकरा महिन्यात पोलीस ठाणेनिहाय आलेल्या तक्रारी 

पिंपरी - ११३४

भोसरी - १३४९ 

सांगवी - २००३ 

चिंचवड - १३६४

निगडी - ७८९

रावेत - ७७५ 

देहूरोड - ८२५

तळेगाव - ५६८

शिरगाव - ७० 

तळेगाव एमआयडीसी - १२१

वाकड - ३२१५

हिंजवडी - ३५६६

चाकण - १०८५ 

म्हाळुंगे - २८१ 

आळंदी - २९२

दिघी - ९२३

चिखली - १५१८

भोसरी एमआयडीसी - ८११

Share this story

Latest