संग्रहित छायाचित्र
पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांनी दहशत वाढली आहे. स्टेशन परिसरात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी स्टेशन परिसरात गुंगीचे औषध देवून ४३ हजारांची रोकड चोरल्याची घटना घडली होती. तर चाकण मधील एका तरुणाला लुटल्याची घटना देखील ताजी आहे. अशीच एक घटना स्टेशन परिसरातून समोर आली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चक्क ब्लेडने वार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
वडिथा गोविंदा नाईक (वय २८, रा. बिबवेवाडी) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी वडिथा नाईक हे पुणे स्टेशन स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ जवळून शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जात होते. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. नाईक यांनी पैसे देण्यास नकार दिला. चोरट्याने नाईक यांच्या खिशातील आठशे रुपये काढून घेतले. तसे करताना नाईक यांनी चोरट्याला विरोध केला. मात्र चोरट्याने फिर्यादी नाईक यांच्यावर ब्लेडने वार केले. नाईक यांनी आरडाओरडा केला. ते बघून चोरटा तिथून पसार झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुणे स्टेशन लोकांची वर्दळ असलेला परिसर आहे. असे असूनही या परिसरात नशेबाज तसेच चोरट्यांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. प्रवाशांना धमकावणे, त्यांच्याकडील रोकड, मोबाइल काढून घेणे यांसारख्या घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने या नशेबाज चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.