संग्रहित छायाचित्र
कामावरून घरी निघालेल्या महिलेच्या अंगावर एका व्यक्तीने ॲसिड फेकले. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. शेजाऱ्या सोबत अक्कलकोटला जाऊ नको म्हणत व्यक्तीने महिलेवर ॲसिड फेकून तिला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी पाच वाजता चाकण तळेगाव रोडवर महाळुंगे येथे घडली.
याप्रकरणी 32 वर्षीय जखमी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धूधन मधुकर गायकवाड (रा. देहुगाव. मूळ रा नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला महाळुंगे येथील एका खाजगी कंपनीत काम करतात. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्या कामावरून घरी जात होत्या. चाकण तळेगाव रोडवर महाळुंगे येथे आरोपीने फिर्यादी महिलेला अडवले. तू तुझ्या शेजाऱ्या सोबत अक्कलकोटला जाऊ नको असे म्हणत आरोपीने पत्र्याच्या डब्यात आणलेले ॲसिड फिर्यादीच्या डोक्यावरून संपूर्ण अंगावर ओतले. ॲसिडच्या पत्र्याच्या डब्याने फिर्यादी महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली. यामध्ये फिर्यादीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. यानंतर पळून जात असलेल्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.