संग्रहित छायाचित्र
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्याला रावेत पोलिसांनी अटक केली. शनिवारी (दि. ३) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आकुर्डी ते देहूरोड रेल्वे ट्रॅक दरम्यान रावेत येथे कारवाई करण्यात आली.
नरेश दलबहादूर (वय २० वर्षे, रा. गुप्ता फर्निचरच्या बाजूला, औंध-रावेत बीआरटीजवळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी साहाय्यक उपनिरीक्षक संतोष दशरथ कोळगे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा पिस्तूल बाळगून एकजण रावेत परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकुर्डी ते देहूरोड रेल्वे ट्रॅक दरम्यान रावेत येथे संशयित दलबहादूर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून रावेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.